कसा शिकवणार धडा? गुन्हेगारांची धिंड काढणारे पोलीस दहशतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 12:32 PM2020-09-25T12:32:21+5:302020-09-25T12:32:40+5:30

कायद्याचा बडगा उगारण्याची मुभा असलेले पोलीसच धास्तीत येत असतील तर गुन्हेगारांना वठणीवर कोण आणेल, असा सामान्यांचा प्रश्न आहे.

How to teach a lesson? Police terrorize criminals | कसा शिकवणार धडा? गुन्हेगारांची धिंड काढणारे पोलीस दहशतीत

कसा शिकवणार धडा? गुन्हेगारांची धिंड काढणारे पोलीस दहशतीत

Next

नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : त्यांची एक टोळी आहे. त्यांचे ‘भाई’ दारू, गांजा, हेरॉईन, एमडी अशा सर्वच प्रकारच्या व्यसनात बुडाले आहेत. व्यसनपूर्तीसाठी ते चाकू, तलवारी, गुप्ती घेऊन कुणावरही हल्ला करतात आणि करवून घेतात. कुणालाही लुटतात. शहरातील वर्दळीच्या भागात हैदोस घालतात. खंडणी वसुलीही होते. त्यांचे हे सर्व बिनबोभाट सुरू आहे. ते कुणाला घाबरत नाहीत. मात्र, त्यांना वठणीवर आणायला गेलेले पोलीस आता घाबरू लागले आहेत. होय, सर्वत्र चर्चेचे रान पेटविणाऱ्या धिंड प्रकरणाने सध्या नागपूर पोलिसांना चांगलीच धडकी भरवली आहे.

प्रकरण जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे. बुधवारी रात्री बिअर बारमध्ये अचानक चाकू, तलवार, गुप्ती असे घातक शस्त्र घेऊन सहा गुंड शिरले. त्यांनी नंग्या तलवारी दाखवून ग्राहकांनाच नव्हे तर बार व्यवस्थापकालाही धमकावले. बारच्या गल्ल्यासोबत दारूच्या बाटल्या लुटल्या. काहींनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर घातक शस्त्र उगारले. सुदैवाने शस्त्र कुणाला लागले नाही. अवघ्या पाच मिनिटात बार लुटून आरोपी फरार झाले. ते नाराकडे गेले. तेथे यथेच्छ दारू पिले आणि मनसोक्त जेवून पुन्हा नव्या गुन्ह्याच्या तयारीत लागले. दरम्यान, भर वस्तीतील बार सिनेस्टाईल लुटला गेल्यामुळे पोलिसांची विविध पथके रात्रभर आरोपींचा शोध घेऊ लागली. गुरुवारी पहाटेच्या वेळी सहाही आरोपी पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी त्यांना आहे त्या अर्धनग्न अवस्थेत बाजारपेठ दाखवली. काही तासांपूर्वी नागरिकांना शस्त्र दाखवून, त्यांच्या जानमालाला धोका निर्माण करणाºया आणि दहशत पसरविणाºया गुंडांची नशा उतरली होती. गुंडांची ही अवस्था सर्वसामान्य नागरिकांना आश्वस्तच नव्हे आनंदित करणारी होती. मात्र गुंडांच्या पाठिराख्यांनी त्यांच्या वयाचे अस्त्र पोलिसांवर उगारून त्यांना थंड करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. या पार्श्वभूमीवर, अल्पवयीन मुलांची धिंड काढण्याचा कांगावा करून पोलिसांवर प्रकरण उलटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
विशेष म्हणजे, बार लुटणारे अल्पवयीन असले तरी त्यांचा यापूर्वीचाही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. खापरखेडा, यशोधरानगर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. आधीच्या गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना सुधारगृहात पाठवले होते. त्यांच्या वर्तनात सुधारणा व्हावी हा त्यामागचा उद्देश होता. दोन आठवड्यांपूर्वीच ते सुधारगृहातून बाहेर आले आणि पुन्हा गुन्हे करू लागले. गुरुवारी सकाळी पोलिसांनी त्यांची वरात काढल्यानंतर काहीजण पडद्याआडून पोलिसांवर मानवाधिकार नामक अस्त्र उगारून त्यांची कोंडी करण्याचे प्रयत्न करीत आहेत.

वय लहान, गुन्हे मोठे
नागपुरात बालगुन्हेगारांची संख्या मोठी आहे. प्रत्येक दहाव्या गुन्ह्यात एक ना एक अल्पवयीन आरोपी असतोच. गेल्या आठवड्यात अवघ्या सोळा वर्षाच्या एका आरोपीने धडधाकट मात्र निरपराध तरुणाची गळा कापून हत्या केली. मृत तरुण रोजगाराच्या शोधात आपले कुटुंब सोडून बिहारमधून नागपुरात आला होता. येथे मिळेल ते काम करून आपला खर्च भागवीत होता. तो त्यांच्या कुटुंबीयांचीही होईल ती मदत करत होता. टायगर नामक हा तरुण काम आटोपून रात्रीच्या वेळी घराकडे जात असताना व्यसनाधीन १६ वर्षीय आरोपीने त्याला शंभर रुपये मागितले आणि दिले नाही म्हणून त्याच्या गळ्यावर कैचीचे घाव घालून त्याची निर्घृण हत्या केली. नागपुरात हे पहिले प्रकरण नाही. अपहरण, बलात्कार, दरोडे, खून, खुनाचे प्रयत्न, हाणामाºया अशा गंभीर गुन्ह्यात गेल्यावर्षी २०० पेक्षा जास्त अल्पवयीन आरोपींचा समावेश होता, हे येथे विशेष!

अशा गुन्हेगारांना धडा शिकवायलाच हवा. कायद्याचा बडगा उगारण्याची मुभा असलेले पोलीसच धास्तीत येत असतील तर गुन्हेगारांना वठणीवर कोण आणेल, असा सामान्यांचा प्रश्न आहे.
 

 

Web Title: How to teach a lesson? Police terrorize criminals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस