विद्यार्थ्यांचे आधार कसे होणार अपडेट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:06 AM2020-12-23T04:06:18+5:302020-12-23T04:06:18+5:30

पंचायत समितीत युनिट धूळखात नागपूर : शाळांमधील शिक्षकांची पदे निश्चित करताना आधार कार्ड नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ग्राह्य ...

How will the student base be updated? | विद्यार्थ्यांचे आधार कसे होणार अपडेट?

विद्यार्थ्यांचे आधार कसे होणार अपडेट?

Next

पंचायत समितीत युनिट धूळखात

नागपूर : शाळांमधील शिक्षकांची पदे निश्चित करताना आधार कार्ड नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यभरात आधार अपडेटची विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यात या मोहिमेसाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून प्रत्येक पंचायत समितीला आधारचे युनिट उपलब्ध करून दिले. पण हे युनिट ऑपरेट करण्यासाठी ऑपरेटरची नियुक्ती अजूनही करण्यात आली नाही. यंत्रणेला हाताळायला मनुष्यबळच नसल्याने शिक्षण विभागाची पर्यवेक्षीय यंत्रणा हतबल झाली आहे.

शाळा कधी सुरू होणार याबाबत अनिश्चितता असताना तसेच अद्याप अनेक विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचलेले नसताना राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची नोंद मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश शिक्षण विभागाने दिले. सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय जून २०१३ मध्ये राज्य सरकारने घेतला होता. सरल प्रणालीद्वारे ही प्रक्रिया सुरू होती. शाळांनी टप्प्याटप्याने आधार नोंदणी पूर्ण करावी आणि सरल प्रणालीत ३१ मार्चपर्यंत १०० टक्के विद्यार्थ्यांची नोंद पूर्ण करावी, असे आदेश राज्य सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये दिले होते. शाळांमध्ये शिक्षकांची पदे निश्चित करताना आधार कार्ड नोंदणी झालेल्याच विद्यार्थ्यांची संख्या ग्राह्य धरण्यात येईल. त्यामुळे विशेष मोहीम राबवून ही नोंदणी पूर्ण करावी, असे आदेशात म्हटले होते.

नागपूर जिल्ह्यात विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट व नवीन आधार कार्ड काढण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने प्रत्येक पंचायत समितीला आधारचे युनिट उपलब्ध करून दिले. हे युनिट येऊन आता वर्ष झाले आहे. पंचायत समितीस्तरावरील बीआरसी केंद्रामध्ये युनिट पडलेले आहे. युनिट ऑपरेट करण्यासाठी कंत्राटी तत्त्वावर ऑपरेटरची नियुक्ती होणार होती. ऑपरेटरच्या नियुक्त्याच झाल्या नसल्याने आधारचे युनिट बीआरसी केंद्रात धूळखात पडले आहे.

आधारच्या युनिटची दखलदेखील नाही

सर्वच पंचायत समितीच्या बीआरसी केंद्रावर आधार युनिट वर्षभरापासून येऊन पडले आहे. ते इन्स्टॉलदेखील करण्यात आले नाही. इन्स्टॉल करणारी यंत्रणा बाहेरून येणार होती. यात संगणक, प्रिंटर, थम्ब मशीन आहे. ज्या बॉक्समध्ये हे युनिट पॅक केले, तो खर्डा असलेला बॉक्स सडून गळला आहे. हे युनिट का आले, याचा उपयोग कधी होणार, ऑपरेटर कधी येणार, याकडे कुणाचेही लक्ष नाही. कुणी पाठपुरावाही केला नाही.

दोन तालुक्यांची प्रायोगिक तत्त्वावर निवड

विद्यार्थ्यांची आधार अपडेट मोहिम प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यासाठी जिल्ह्यात पारशिवनी व सावनेर या दोन तालुक्यांची निवड करण्यात आली होती. पारशिवनी पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी कैलास लोखंडे म्हणाले, अजून युनिट ऑपरेट करणारा ऑपरेटर आलेला नाही. वरिष्ठांकडे याची माहितीही दिली आहे. तर सावनेर पं.स.चे गटशिक्षण अधिकारी भाकरे यांनी सांगितले दोनपैकी एक ऑपरेटर रुजू झाला आहे. दुसरा ऑपरेटर पाठविलेला नाही. येत्या २८ डिसेंबर रोजी आमचे शिबिर लागणार आहे.

Web Title: How will the student base be updated?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.