लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंधांमध्ये सूट दिली आहे. नागपूरही सोमवारपासून अनलॉक झाले. परंतु नागरिकांनी संयम पाळला नाही. अनलॉक होताच नागरिकही अनियंत्रित झाले. सोमवारी नागपुरातील सर्वच बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी दिसून आली. बाजारातील ही अनियंत्रित गर्दी पाहता नागपुरात कोरोना नियंत्रणात येईल की पुन्हा संक्रमण वाढेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
सरकारने जारी केलेल्या यादीनुसार नागपूर हे लेव्हल १ मध्ये येते. यात सर्व व्यवहार सुरू करण्याची परवानगी आहे. परंतु बाजारात गर्दी होऊन पुन्हा कोरोनाचा संसर्ग पसरू नये, यासाठी स्थानिक प्रशासनाने अतिशय सावधगिरी बाळगत निर्बंधांसह व्यापार व व्यवहार सुरू करण्याचा निर्णय घेतला. सायंकाळी ५ वाजेपर्यंतच दुकाने व व्यापार सुरू ठेवण्याची परवानगी दिली.
सोमवारी नागपुरातील सर्व बाजार सुरू झाला. परंतु ज्याची भीती होती, तेच घडले. पहिल्याच दिवशी नागरिकांनी बाजारात प्रचंड गर्दी केली. सीताबर्डी, महाल, सदर, धरमपेठ, गांधीबाग यासारख्या मुख्य बाजारपेठेत प्रचंड गर्दी होती. सुरक्षित अंतराच्या नियमांची सर्रासपणे पायमल्ली झाली.
नागपुरातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी कोरोनाचा विषाणू मात्र अजूनही पूर्णपणे गेलेला नाही, ही बाब नागरिकांनी समजून घ्यावी. त्यामुळे स्वत:ला आवर घालावा. अन्यथा बाजारातील ही गर्दी पुन्हा एकदा नागपुरात काेरोनाचा संसर्ग पसरविण्यात कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हॉटेल रेस्टाॅरंट हाऊसफुल्ल
प्रशासनाने हॉटेल रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने उघडण्यास परवानगी दिली आहे. तसेच इतर दुकानदारांपेक्षा त्यांना रात्री १० वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. परंतु सोमवारी बहुतांश हॉटेल रेस्टॉरंट हाऊसफुल्ल होती. अनेक हॉटेल रेस्टॉरंट चालकांनी नियमांचे पालन केले नाही.
बाजारात उत्साह, दुकानदार-व्यापारी आनंदी
सोमवारी बाजारात प्रचंड उत्साह दिसून आला. निर्बंध कायम असले तरी सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने सुरू राहणार असल्याने दुकानदार-व्यापारी आनंदात होते. विशेषत: जीम, सलून, पार्लर चालक, चहा पानटपऱ्या चालविणारे छोटे व्यावसायिक आदींच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता.
लहानांपासून तर मोठ्या दुकानांपर्यंत सर्वांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करीत दुकानांमध्ये सॅनिटायझरची व्यवस्था ठेवली होती.