भरतवन वाचविण्यासाठी मानवी शृंखला आंदोलन बुधवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 11:49 PM2019-04-27T23:49:51+5:302019-04-27T23:50:54+5:30
शहरातील विविध क्षेत्रातील संस्था व व्यक्तींनी भरतवन वाचविण्यासाठी ताकद एकवटली आहे. ते १ मे रोजी सकाळी ७.३० वाजता फुटाळा तलाव परिसरात मानवी शृंखला आंदोलन करणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील विविध क्षेत्रातील संस्था व व्यक्तींनी भरतवन वाचविण्यासाठी ताकद एकवटली आहे. ते १ मे रोजी सकाळी ७.३० वाजता फुटाळा तलाव परिसरात मानवी शृंखला आंदोलन करणार आहेत.
आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी कार्य करीत असलेले शरद पालीवाल, डॉ. तपन चक्रवर्ती, जयदीप दास, श्रीकांत देशपांडे, गिरीश मुळे व सचिन काळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. फुटाळा तलाव परिसरात खुला रंगमंच बांधण्यात येणार असून, त्याची जबाबदारी महामेट्रोकडे सोपविण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत भरतनगर ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयापर्यंत नवीन रोड बांधला जाणार आहे. हा रोड विकास आराखड्यात असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. हा रोड पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या हिरव्यागार परिसरातून जाणार आहे. भरतवन म्हणून प्रसिद्ध असलेल्या या परिसरात पूर्णपणे वाढ झालेली ७० ते ८० वर्षे जुनी मोठमोठी झाडे आहेत. या रोडसाठी ती झाडे तोडण्याची परवानगी मनपाला मागण्यात आली आहे. या रोडसाठी शेकडो झाडे तोडली जाणार आहेत. त्यामुळे या रोडचा प्रस्ताव रद्द करण्यात यावा, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. आंदोलनकर्त्यांचा विकासाला विरोध नाही. परंतु, विकास हा पर्यावरणाचे रक्षण करून झाला पाहिजे. पर्यावरण नष्ट झाल्यास जीवनसृष्टी नष्ट होईल, असे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.
पॅरिस कराराचे पालन करावे
भारत सरकारने पॅरिस करारावर स्वाक्षरी करून वनक्षेत्राचा विस्तार करण्याची ग्वाही दिली होती. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला भारताच्या आंतरराष्ट्रीय बांधिलकीचे पालन करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेता त्यांनी भरतवन नष्ट करू नये, याकडे आंदोलनकर्त्यांनी लक्ष वेधले.
हायकोर्टाचा स्थगनादेश
यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका प्रलंबित आहे. न्यायालयाने ही याचिका स्वत:च दाखल करून घेतली आहे. या रोडसाठी भरतवनमधील एकही झाड तोडण्यात येऊ नये, असा अंतरिम आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या परवानगीशिवाय येथील एकही झाड तोडता येणार नाही. महाराष्ट्र मेट्रो कॉर्पोरेशनने हा रोड बांधण्यासाठी १९८ झाडे तोडण्याची परवानगी मिळावी, याकरिता महानगरपालिकेकडे अर्ज दाखल केला आहे.