लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्यासह वीजदर निम्मे करण्यात यावे, या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे सोमवारी विदर्भभर १०० ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करीत चक्का जाम करण्यात आला. यावेळी विदर्भात शेकडो आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना अटक करून नंतर त्यांची सुटका करण्यात आली.विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे नागपूर शहरात गणेशपेठ येथील मुख्य बसस्थानक येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. शहरातील कार्यकर्ते बस स्थानकासमोरील अध्यापक भवनाच्या आवारात एकत्र आले व तेथून झेंडे व बॅनरसह घोषणा देत मुख्य बसस्थानकाच्या एसटी बसेस ज्या गेटमधून बाहेर पडतात त्या गेटवर आंदोलनकर्त्यांनी ठिय्या मांडून बसेस रोखण्यात आल्या. त्यामुळे काही वेळ येथील वाहतूक जाम झाली होती. जवळपास तासभर घोषणाबाजी करीत आंदोलनकर्ते ठिय्या मांडून होते. यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली. काही वेळानंतर सर्व आंदोलनकर्त्यांना सोडण्यात आले.विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य समन्वयक राम नेवले यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात डॉ. श्रीनिवास खांदेवाले, धर्मराज रेवतकर, रेखा निमजे, विजया धोटे, राजेश बंडे, सुहासिनी खडसे, अण्णाजी राजेधर, मुकेश मासूरकर, गुलाबराव धांडे, प्रशांत मुळे, गणेश शर्मा, रजनी शुक्ला, ममता बोरकर, ज्योती खांडेकर, माधुरी चव्हाण, प्यारूभाई नौशाद हुसैन, सुनील खंडेलवाल, विजय मौंदेकर, रामभाऊ कावडकर आदींसह शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
२०० युनिटपर्यंत घरगुती वीज फ्री करादेशात सर्वात महाग वीज महाराष्ट्रात आहे. वीज दरवाढीमुळे जनता त्रस्त आहे; वरून महावितरण कंपनीने २० टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव दिला आहे. ही अन्यायकारक दरवाढ आम्ही सहन करणार नाही. विदर्भातील जनतेला २०० युनिटपर्यंत घरगुती वीज फ्री करण्यात यावी. त्यानंतरच्या युनिटला निम्मे दर लावावे, अशी मागणी मुख्य संयोजक राम नेवले यांनी केली.
२५ फेब्रुवारीला रेल रोको, १ मे रोजी विदर्भ बंदभाजपच्या केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य तातडीने द्यावे, अशी मागणी करीत या मागणीसाठी येत्या २५ फेब्रुवारी रोजी रेल रोको आंदोलन करण्यात येईल. तर १ मे रोजी विदर्भ बंदचे आवाहन करण्यात आल्याचे यावेळी संघटनेतर्फे स्पष्ट करण्यात आले.