थकबाकी व भत्त्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांचे उपोषण; दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
By गणेश हुड | Published: September 14, 2022 05:06 PM2022-09-14T17:06:30+5:302022-09-14T17:06:52+5:30
प्रशासनाचे मागण्यांकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप
नागपूर : महापालिकेतील कर्मचारी मागील काही वर्षांपासून न्याय मागण्यासाठी लढा देत आहेत. निदर्शने, धरणे आंदोलने झाली मात्र प्रशासनाकडून प्रतिसाद मिळाला नाही. मागण्यासाठी राष्ट्रीय नागपूर कापोर्रेशन एम्प्लाईज असोसिएशनच्या नेतृत्वात कर्मचारी व शिक्षकांनी संविधान चौकात बुधवारी साखळी उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाने याची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
उपोषणात संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे, रंजन नलोडे, प्रवीण तंत्रपाळे, बाबा श्रीखंडे, संजय मोहले, हेमराज शिंदेकर, विलास सेलसुरकर, गौतम गेडाम, दीपक स्वामी, पुरुषोत्तम कैकाडे, अशोक खाडे, विलास कडू, भीमराव मेश्राम, ईश्वर मेश्राम, नामदेवराव तितरमारे, अरुण तुर्केल, प्रदीप होले, सतीश जनवरे, प्रमिला बांगर, मिलिंद चकोले, प्रेमानंद अडकीने, रामविलास पांडे, नामदेव शेंडे, सुरेंद्र ढोरे, संजय गटकिने, ओंकार लाख, डॉ. श्याम शेंडे, मनोहर गणेशे, अभय अप्पनवार आदींनी सहभाग घेतला आहे.
अशा आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या
- सातव्या वेतन आयोगाची १६ महिन्यांची थकबाकी द्या.
- सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार आश्वासीत प्रगती योजना लागू करा.
- मनपा कर्मचारी, शिक्षक सेवानिवृत्तीधारकांना १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा.
- ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना स्थायी करताना २० वर्षांची अट रद्द करून स्थायी नियुक्ती द्यावी.
- शासन निर्णयानुसार सुधारीत वाहतूक भत्ता लागू करावा.
- मनपातील तांत्रिक व प्रशासकीय संवर्गातील पदोन्नतीच्या रिक्त जागा भरण्यात याव्या.
- मनपात श्रम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, कर्मचाऱ्यांना गणवेश वाटप करावे.