अपघातात पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:13 AM2021-09-08T04:13:30+5:302021-09-08T04:13:30+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : वेगात असलेल्या कंटेनरने विरुद्ध दिशेने येणाऱ्या माेटरसायकलला वळणावर धडक दिली. यात कंटेनरच्या चाकाखाली आल्याने ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : वेगात असलेल्या कंटेनरने विरुद्ध दिशेने येणाऱ्या माेटरसायकलला वळणावर धडक दिली. यात कंटेनरच्या चाकाखाली आल्याने पतीचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना सावनेर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-सावनेर-पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गावरील हेटी शिवारात मंगळवारी (दि. ७) रात्री ७ वाजताच्या सुमारास घडली.
गोकुळ भदुजी पडागडे (५६) असे मृत पतीचे तर रामप्यारी गोकुल पडागडे (५३) असे गंभीर जखमी पत्नीचे नाव आहे. ते हिंगणघाट, जिल्हा वर्धा येथील रहिवासी असून, विना क्रमांकाच्या माेटरसायकलने हिंगणघाटहून नागपूर, सावनेर मार्गे बैतूल (मध्य प्रदेश)ला जात हाेते. या मार्गावरील हेटी शिवारात विरुद्ध दिशेने वेगात आलेल्या एचआर-३८/टी-१२५३ क्रमांकाच्या कंटनरने पाेलीस चाैकीजवळील वळणावर कळमेश्वरच्या दिशेने वळण घेतले. त्यातच त्या कंटेनरची माेटरसायकलला धडक लागली.
यात गोकुळ पडागडे हे कंटेनरच्या चाकाखाली आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी रामप्यारी पडागडे फेकल्या गेल्याने त्यांच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली. यावेळी पाऊसही सुरू हाेता. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून गाेकुळचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तर रामप्यारी यांना उपचारासाठी सावनेर येथील शासकीय रुग्णालयात आणले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर रामप्यारी यांना नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी भादंवि २७९, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक सागर कारंडे करीत आहेत.