नांद : काळ कुणासाठी थांबत नाही. मृत्यू अटळ असतो, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. परंतु अनपेक्षितपणे एखाद्याचे मरण त्या कुटुंबावर वज्राघात ठरणारे असते. काही ध्यानीमनी नसताना अल्पश: आजाराने पत्नीचे हृदयविकाराने निधन झाले. या दु:खातून सावरतच असताना अवघ्या २४ तासाच्या आत पतीचाही मृत्यू झाला. नांद (ता. भिवापूर) येथील गभणे कुटुंबात बुधवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेमुळे नांद परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
भिवापूर तालूक्यातील नांद येथील सूर्यभान रामाजी गभणे (७३) हे पत्नी अंजना (६५) व कुटुंबीयासह आनंदात जीवन जगत होते. शिक्षक असलेले सूर्यभान हे २००४ ला सेवानिवृत्त झाले. त्यांचे नांद येथे स्वमालकीचे घर आहे. दोन मुले, सुना व नातवंड असा त्यांचा परिवार. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मोठ्या मुलाचा अपघात झाला. यात त्याचा एक पाय निकामी झाला. यात ते काहीसे खचले होते. मात्र कुटुंबासाठी गभणे दांम्पत्य झटले. अशात काळाने अंजना यांच्यावर झडप घातली. एकाच रात्री त्यांची प्रकृती बिघडली. हृदयविकाराच्या धक्क्याने मंगळवारी (दि. १९) जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूचा सूर्यभान यांना धक्का बसला. बुधवारी पवनी येथील वैनगंगा नदीपात्रात अंजना यांच्या अस्थिविसर्जनासाठी कुटुंबीय जाणार होते. घरात पाहुणे होते. अशातच सूर्यभान यांची प्रकृती खालावली. सकाळी ६ वाजताच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आईनंतर वडीलही गेल्याने मुलांनी व नातवंडानी हंबरडा फोडला. या घटनेमुळे नांद परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.