लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पत्नीचा निर्घृण खून करणाऱ्या पतीची जन्मठेप व इतर शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला. ही घटना कळमना पोलिसांच्या हद्दीतील आहे.
अमित ऊर्फ पप्पू रामा बुधबावरे (३६) असे आरोपीचे नाव असून तो पुनापूर येथील रहिवासी आहे. मयताचे नाव सुनीता होते. ही घटना १७ डिसेंबर २०११ रोजी घडली. त्या दिवशी मध्यरात्रीनंतर आरोपीने सुनीताच्या नावावर असलेल्या प्लॉटची कागदपत्रे मागितली. सुनीताने त्याला कागदपत्रे सकाळी देते असे सांगितले. त्यावरून आरोपीने सुनीताला शिवीगाळ करायला सुरुवात केली. तसेच, तिच्यावर चाकू व इतर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. आरोपीने खून करण्याच्या उद्देशातून सुनीताला २१ गंभीर जखमा केल्या. त्यामुळे सुनीताचा मृत्यू झाला.
९ डिसेंबर २०१५ रोजी सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेप व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने आरोपीची क्रूरता लक्षात घेता ते अपील फेटाळून लावले. सरकारतर्फे ॲड. संजय डोईफोडे यांनी कामकाज पाहिले.
दया दाखवण्यास नकार
आरोपीला म्हातारी आई व दोन मुले असल्यामुळे त्याच्यावर दया दाखविण्याची विनंती उच्च न्यायालयाला करण्यात आली होती. परंतु, दोन मुले आरोपीच्या आईसोबत रहात असल्याचे पुरावे रेकॉर्डवर नव्हते. परिणामी, न्यायालयाने आरोपीसंदर्भात सौम्य भूमिका घेण्यास नकार दिला.