घरगुती वादातून पती-पत्नीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 10:42 PM2019-07-16T22:42:01+5:302019-07-16T22:44:32+5:30
कौटुंबिक वाद विकोपास गेल्याने पत्नीने रागाच्या भरात विहिरीत उडी घेतली. तिच्या पाठोपाठ पतीनेही त्याच विहिरीत उडी घेतली. त्यात दोघांचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना काटोल शहरातील अर्जुननगर भागात मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (काटोल) : कौटुंबिक वाद विकोपास गेल्याने पत्नीने रागाच्या भरात विहिरीत उडी घेतली. तिच्या पाठोपाठ पतीनेही त्याच विहिरीत उडी घेतली. त्यात दोघांचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना काटोल शहरातील अर्जुननगर भागात मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
गजानन नत्थू धोटे (४६) व शुभांगी गजानन धोटे (४०) रा. शेटे ले-आऊट, अर्जुननगर, काटोल अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. गजानन हा मूळचा काटोल तालुक्यातील येरला (धोटे) येथील रहिवासी असून, तो काही वर्षांपासून अर्जुननगरातील शेटे ले-आऊटमध्ये राहायचा. तिथे त्याचे स्वत:चे घर आहे. तो मंगळवारी (दि. १६) दुपारी २ वाजताच्या सुमारास घरी दारू पिऊन आला आणि पत्नी शुभांगीसोबत भांडायला लागला. भांडण विकोपास गेल्याने शुभांगीने दार उघडून जवळच असलेल्या विहिरीच्या दिशेने धाव घेतली आणि लगेच विहिरीत उडी मारली.
तिच्याच मागे गजानन निघाला होता. त्यानेही तिच्या पाठोपाठ त्याच विहिरीत उडी मारली. हा प्रकार लक्षात येताच एका शेजाऱ्याने त्यांना वाचविण्यासाठी विहिरीत दोर सोडला. शुभांगीने दोर पकडला असता, गजानननेही दार पकडण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात शुभांगीच्या हातून दोर सुटला आणि ती पाण्यात बुडाली. दुसरीकडे, उडी मारताना गजाननच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला पोहता येत असले तरी तो पोहू शकला नाही. त्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात पाठविले. वृत्त लिहिस्तो या घटनेबाबत कुणीही पोलिसात तक्रार दाखल केली नव्हती.