पत्नीच्या पुढाकाराने पतीचे अवयवदान : ४८ तासात दुसरे अवयवदान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 11:18 PM2021-06-12T23:18:40+5:302021-06-12T23:19:06+5:30

Organ donation शनिवारी पुन्हा एका मेंदू मृत (ब्रेन डेड) व्यक्तीकडून यकृत व दोन्ही मूत्रपिंड दान करून तीन रुग्णांना जीवनदान मिळाले. ४८ तासातील हे दुसरे अवयवदान आहे.

Husband's organ donation on wife's initiative: Second organ donation in 48 hours | पत्नीच्या पुढाकाराने पतीचे अवयवदान : ४८ तासात दुसरे अवयवदान 

पत्नीच्या पुढाकाराने पतीचे अवयवदान : ४८ तासात दुसरे अवयवदान 

Next
ठळक मुद्देदोन्ही मूत्रपिंड व यकृतदानाने तिघांना जीवनदान

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : अवयवदानाचे अनन्यसाधारण महत्त्व आता समाजात रुजायला लागले आहे. विशेषत: नातेवाईक असह्य दु:खात असताना स्वत:ला सावरत आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेत आहेत. त्यांच्या या संयम आणि मानवतावादी भूमिकेमुळे शनिवारी पुन्हा एका मेंदू मृत (ब्रेन डेड) व्यक्तीकडून यकृत व दोन्ही मूत्रपिंड दान करून तीन रुग्णांना जीवनदान मिळाले. ४८ तासातील हे दुसरे अवयवदान आहे. विशेष म्हणजे, ‘ब्रेन डेड’ झालेल्या पतीच्या अवयवदानासाठी त्याच्या पत्नी आणि मुलाने पुढाकार घेतल्याने या दानाला अधिक महत्त्व आले आहे.

अयोध्यानगर श्रीरामवाडी येथील रहिवासी प्रकाश कापसे (५८)असे अवयवदात्याचे नाव. प्राप्त माहितीनुसार, ९ जून रोजी प्रकाश कापसे हे कारखान्यातील कामाच्या ठिकाणी उंचीवरून खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने न्यू इरा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. परंतु ११ जून रोजी सायंकाळी डॉक्टरांनी कापसे यांचे ‘ब्रेन डेड’ म्हणजे मेंदू मृत झाल्याची माहिती कुटुंबीयांना दिली. डॉ. अश्विनी चौधरी यांनी कापसे कुटुंबीयांचे समुपदेशन करीत अवयवदान करण्याचा सल्ला दिला. कापसे यांच्या पत्नी सविता व २२ वर्षीय मुलगा प्रथमेश यांनी अवयवदान करण्यास तत्परता दाखवली. याची माहिती तातडीने ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन सेंटर’ला (झेडटीसीसी) देण्यात आली. ‘झेडटीसीसी’च्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी व सचिव डॉ. संजय कोलते यांच्या मार्गदर्शनात अवयवदानाची पुढील प्रक्रिया समन्वयिका वीणा वाठोरे यांनी पूर्ण केली. शनिवारी दुपारी अवयव काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. दोन्ही मूत्रपिंड व यकृताचे दान करण्यात आले.

आतापर्यंत १२७ मूत्रपिंड व ५७ यकृताचे दान

झेडटीसीसी’, नागपूरच्यावतीने आतापर्यंत ७३ व्यक्तींचे अवयवदान झाले. यात १२७ मूत्रपिंड, ५७ यकृत तर १३ हृदयाचे दान करण्यात आले. आज कापसे यांच्या अवयवदानातून न्यू इरा हॉस्पिटलमधील ५८ वर्षीय पुरुषाला यकृत, याच रुग्णालयातील ५० वर्षीय महिलेला मूत्रपिंड तर सेव्हन स्टार हॉस्पिटलमधील २३ वर्षीय पुरुषाला दुसरे मूत्रपिंड दान करण्यात आले.

या डॉक्टरांच्या चमूने केले प्रत्यारोपण

न्यू इरा हॉस्पिटलमध्ये यकृताचे प्रत्यारोपण डॉ. राहुल सक्सेना, डॉ. साहिल बन्सल व डॉ. स्नेहा खाडे यांनी केले. याच हॉस्पिटलमध्ये मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण डॉ. प्रकाश खेतान, डॉ. शबीर राजा, डॉ. रवी देशमुख यांनी केले. सेव्हन स्टार हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण डॉ. नीलेश भांगे, डॉ. सदाशिव भोळे, डॉ. शब्बीर राजा, डॉ. मोहन नेरकर, डॉ. रमेश हसानी, व डॉ. इंद्रजित अग्रवाल यांच्या सहकार्याने करण्यात आले.

Web Title: Husband's organ donation on wife's initiative: Second organ donation in 48 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.