नागपूर : सध्या भाजपात माेठ्याप्रमाणावर काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीतून अनेक नेते प्रवेश करत आहेत. त्यामुळे हे पक्षप्रवेश असेच सुरु राहिल्यास येत्याकाळात भाजपाचे देखील काॅंग्रेस हाेईल अशी टीका राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी केली.पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी शनिवारी नागपूरच्या संताजी सांस्कृतिक सभागृहात आले असता पत्रकारांशी ते बोलत होते.
जानकर म्हणाले, सध्या राज्यात विराेधी पक्षाचे अस्तित्वच उरलेले नाही. आमची राज्यात ताकद आहे. रासपचे राज्यात ९८ जिल्हा परिषद सदस्य, ४ नगराध्यक्ष, ३ सभापती, ६ उपनगराध्यक्ष, २ आमदार आहेत. त्यामुळे पक्षाने भाजपाकडे ५७ जागांची मागणी केली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला दिलेला शब्द पूर्ण केला. पशुसंवर्धन विभागाचे बजेट आधी १२० कोटीचे होते. आता ते ७ हजार ५०० कोटींवर गेले आहे. विदर्भातील दूध उत्पादन दहा हजार लिटरवरून साडेचार लाखांवर गेले आहे. केंद्रातही स्वतंत्र पशुसंवर्धन विभाग निर्माण करण्यात आला. याचा विचार करता आम्हाला पुन्हा पाच वर्ष संधी मिळेल.
येत्या 25 ऑगस्टला मुंबईत रासपचा वर्धापन दिन आहे. या मेळाव्याला 10 लाख कार्यकर्ते येतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेचे सुभाष देसाई, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार असल्याची माहिती जानकर यांनी दिली.