सर्वांना पास करणार तर प्रवेश कुठल्या आधारावर होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 07:00 AM2021-04-22T07:00:00+5:302021-04-22T07:00:11+5:30
Nagpur news राज्य शिक्षण मंडळ, केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड व आयसीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला आहे. परंतु अकरावीत प्रवेश कुठल्या आधारावर होईल, याची चिंता पालकांना भेडसावत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य शिक्षण मंडळ, केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड व आयसीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला आहे. परंतु अकरावीत प्रवेश कुठल्या आधारावर होईल, याची चिंता पालकांना भेडसावत आहे. सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास अकरावीच्या जागा कमी पडतील. त्यामुळे प्रवेशासाठी भटकंती करावी लागणार आहे.
शिक्षण विभागाच्या म्हणण्यानुसार विद्यार्थी व पालकांनी चिंता करण्याची गरज नाही. सरकार व बोर्ड दोन्ही मिळून अकरावीच्या प्रवेशाबाबत मार्ग काढत आहे. यासंदर्भात चर्चा सुरू आहे. या चर्चेत असेही मत व्यक्त झाले, की अकरावीच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतली जावी. यासंदर्भात लवकरच ठोस निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया लवकर संपेल व विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.
पालकांच्या मते शिक्षण विभागाला लवकरच धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल, अन्यथा विद्यार्थ्यांवर अन्याय होईल. सर्वच विद्यार्थ्यांची इच्छा असते की, चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा. जर सर्वांना मान्य असलेले धोरण न ठरविल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. शिक्षण विभाग लवकरच निर्णय घेईल, असे सुत्रांचे म्हणणे आहे. दरवर्षी अकरावीची प्रवेश प्रक्रिया मे महिन्यात सुरू होते. त्या दृष्टीकोनातून शिक्षण विभाग लवकरच निर्णय घेणार आहे.