रेशनिंग व्यवस्था ठप्प झाल्यास राज्यात हाहाकार होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 01:28 AM2018-03-29T01:28:47+5:302018-03-29T01:29:10+5:30
राज्यातील स्वस्त धान्य व केरोसीन दुकानदार संघटनांनी १ एप्रिलपासून माल न भरण्याचा व वितरित न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रेशनिंग व्यवस्था ठप्प पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे झाल्यास राज्यात हाहाकार निर्माण होईल. अशी भीती माजी मंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: राज्यातील स्वस्त धान्य व केरोसीन दुकानदार संघटनांनी १ एप्रिलपासून माल न भरण्याचा व वितरित न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रेशनिंग व्यवस्था ठप्प पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे झाल्यास राज्यात हाहाकार निर्माण होईल. अशी भीती माजी मंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या नियंत्रणाखाली राज्यातील रेशनिंग व्यवस्था राबविण्यात येते. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये मी स्वत: या खात्याचा मंत्री होतो. राज्यातील गरजू व गरीब रेशनकार्ड धारक लोकांना सवलतीच्या दरात अन्नधान्य वितरण करण्याची व्यवस्था स्वस्त धान्य दुकानांमार्फत पुरवठा विभागामार्फत राबविली जाते. आघाडी सरकारच्या काळात कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानांमार्फत स्वस्त अन्नधान्याचे वाटप करण्यात येत होते. मात्र भाजपा युतीची सत्ता येताच पुरवठा विभागाच्या अनेक योजना तात्काळ बंद करण्यात आल्यात. त्यात आमच्या आघाडी सरकारच्या काळातील कार्ड धारकांना दिले जाणारे धान्य बंद करण्यात आले. रेशनवर मिळणारी साखरही बंद करण्यात आली अंत्योदयचा धान्य कोटा कमी केला. तसेच टप्प्याटप्प्याने गोरगरिबांना देण्यात येणारे केरोसीन सुध्दा बंद करीत आहे. अशाप्रकारे गोरगरिबांच्या तोंडचा घासच या सरकारने हिसकावला असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे.
राज्यातील स्वस्त धान्य व केरोसीन दुकानदार संघटनांनी १ एप्रिलपासून माल न भरण्याचा व वितरित न करण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील गोरगरीब रेशनकार्डधारकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे सरकारने संघटनासोबत बरोबर चर्चा करून त्यांच्या न्याय मागण्या मान्य करून त्वरित तोडगा काढणे गरजेचे असल्याचे देशमुख यांनी सांगितले.