नागपूर : खरे तर विद्यार्थिदशेपासून हातात पुस्तक असायला हवे. ज्याच्या हातात पुस्तक असते त्याला कशाचीही भीती बाळगण्याचे कारण नाही. मुले पुस्तकांपर्यंत जात नसतील तर पुस्तके मुलांपर्यंत नेण्याचे उपक्रम राबवा, असे आवाहन राज्यस्तरीय पहिल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष एकनाथ आव्हाड यांनी केले.
आकांक्षा प्रकाशनाच्या वतीने रविवारी रेशीमबाग येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या सभागृहात हे एकदिवसीय संमेलन झाले. ‘आजचा बालक-उद्याचा भारत’ ही या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना होती. उद्घाटन बालसाहित्यिक उर्वी खडके हिच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर, स्वागताध्यक्ष प्रा. अरुण पवार, प्राचार्य डॉ. शरयू तायवाडे, मुख्य आयोजक डॉ. अरुणा सबाने, आमंत्रक डॉ. मंजूषा सावरकर उपस्थित होत्या.
आव्हाड पुढे म्हणाले, पालकांनी मुलांना पुस्तके आणून द्यावी, स्वत:ही वाचावी. पालकांच्या हातात पुस्तक दिसले तर मुलेही अनुकरणातून ती वाचायला लागतील. माणूस जोडण्याचे सुंदर काम पुस्तक करतात. त्यामुळे पुस्तकांना मित्र करा. कारण वाचनातूनच विचार दिले जातात.
साहित्य ही जादूची छडी : उर्वी खकडे
उद्घाटनपर भाषणात उर्वी खडके म्हणाली, साहित्य ही जादूची छडी आहे. ती बालपणीच हाती आली तर आयुष्यच बदलून जाते. हॅरी पॉटरसारखे साहित्य लहानांसोबत मोठ्यांनाही आवडत असले तरी तसे साहित्य आपल्याकडे का निर्मिले जाऊ नये, अशी खंतही तिने व्यक्त केली. विज्ञानाने जग सुखाचे होत असेल तर कलेने ते अधिक सुंदर होते, असे सांगून उर्वीने महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला. कला शाखेत शिकण्यासारखे बरेच काही असतानाही केवळ पैसा कमावता येणार म्हणून अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षणाला अधिक महत्त्व देण्याच्या नादात या शाखेला कमी लेखले जाते. मुलांवर अपेक्षांचे ओझे कमी लादा, नाहीतर ते कोलमडून पडतील, असे भावनिक आवाहनही उर्वीने केले.
घराघरांतील पालक आणि पाल्यांमधील संवाद हरविल्याची खंत तिने व्यक्त केली. यामुळे मुले एकटी पडतात, हे टाळायचे असेल तर पालकांनी नोकरी सांभाळून पाल्यांना वेळ द्यावा, कारण संवादातून नाते घट्ट होते, असे मत व्यक्त केले.
स्वागताध्यक्ष अरुण पवार यांनी साहित्याचा वसा व वारसा पुढे नेणारे वारकरी असा बालसाहित्यिकांचा उल्लेख केला. विदर्भाच्या सांस्कृतिक श्रीमंतीबद्दलही माहिती दिली. डॉ. मंजूषा सावरकर यांनी स्वागतपर भाषणातून संमेलनामागील उद्देश सांगितला. तर अरुणा सबाने यांनी बालसाहित्याची पार्श्वभूमी सांगताना साहित्याला जवळ करतो तेव्हाच माणूस परिपक्व होतो, अशी साहित्याची महती प्रास्ताविकातून सांगितली. डॉ. अनुजा नन्नावरे आणि स्वरा सोहनी यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. नीलेश सोनटक्के यांनी आभार मानले. कार्यक्रमाला डॉ. लीना निकम, डॉ. सोनाली हिंगे, दिनेश मासोदकर यांच्यासह इतर उपस्थित होते.
ग्रंथदिंडीने प्रारंभ
सकाळी नऊ वाजता ग्रंथदिंडीने राज्यस्तरीय बाल साहित्य संमेलनाची सुरुवात झाली. नागपूर जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात आले. पारंपरिक वेशातील विद्यार्थी लेझीमच्या तालावर नाचत होते. कार्यक्रमादरम्यान एकनाथ आव्हाड यांच्या ‘खळाळता अवखळ झरा’ या पुस्तकाचे प्रकाशन लीला शिंदे यांच्या हस्ते तर डॉ. वसुधा वैद्य यांच्या ‘गम्माडी गंमत’ या पुस्तकाचे प्रकाशन आव्हाड यांनी केले.
.....