नागपूर : सध्याचे राजकारण प्रचंड दूषित झाले आहे. त्यामुळे लोकशाहीच धोक्यात आली आहे. संविधान वाचविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसह संविधानप्रेमी राजकीय पक्षांनी एकत्र येऊन आघाडी करायला हवी. यासाठी आपलाही प्रयत्न सुरू आहे. आघाडी झाली तर ठीक, नाही तर येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी आपण सज्ज आहोत, असे रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे यांनी येथे स्पष्ट केले.
रविभवन येथे पक्षाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विदर्भ संघटक प्रा. भूषण भस्मे, जिल्हाध्यक्ष धर्मपाल वंजारी, नागपूर ग्रामीण अध्यक्ष शरद दंडाळे, नीलेश खडसन, नितेश रंगारी, अर्पित बागडे, अरविंद कारेमोरे, राजू मेश्राम, विशाल मानवटकर, नरेंद्र तिरपुडे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी लक्ष्मण खडसे यांची पूर्व विदर्भ सचिवपदी तर सचिन पाटील यांची वाडी शहराध्यक्षपदी व हरीश नारनवरे यांची नागपूर जिल्हा सचिवपदी, तर मधुबाला पाटील यांची नागपूर शहर महिला आघाडी उपाध्यक्षपदी आणि पूनम रंगारी यांची शहर सचिवपदी तर नीलम पाटील यांची नागपूर जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
- मोर्चा काढून पटवर्धन मैदान ताब्यात घेणार
नागपुरातील पटवर्धन मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे काम मागील ३० वर्षांपासून प्रलंबित आहे. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पक्षाचे राष्ट्रीय नेते आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून पटवर्धन मैदान ताब्यात घेण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.