सत्तेवर आलो तर सरसंघचालकांना तुरुंगात टाकू : प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:39 AM2018-12-14T00:39:35+5:302018-12-14T00:41:07+5:30
शासनदरबारी कुठलीही नोंदणी नसलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात कुणी उभे राहिले तर त्याच्या नावाने कंड्या पिकविण्याचे काम केले जाते. पंतप्रधानांच्या हत्येच्या कटात माझे नाव जाणुनबुजून अडकविण्यात आले. मात्र याचे उत्तर त्यांना व भाजपाला निवडणुकीत मिळेल. राज्यात त्यांना दोन आकडी जागांवर आम्ही आणू. विशेषत: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांना तर बेकायदेशीरपणे एके-५६ बाळगल्याच्या प्रकरणात आम्ही नागपूरच्याच तुरुंगात टाकू, असे खळबळजनक वक्तव्य भाीरप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले. नागपुरात वंचित बहुजन आघाडीतर्फे अर्थव्यवस्था अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे जाहीर सभेदरम्यान ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासनदरबारी कुठलीही नोंदणी नसलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात कुणी उभे राहिले तर त्याच्या नावाने कंड्या पिकविण्याचे काम केले जाते. पंतप्रधानांच्या हत्येच्या कटात माझे नाव जाणुनबुजून अडकविण्यात आले. मात्र याचे उत्तर त्यांना व भाजपाला निवडणुकीत मिळेल. राज्यात त्यांना दोन आकडी जागांवर आम्ही आणू. विशेषत: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांना तर बेकायदेशीरपणे एके-५६ बाळगल्याच्या प्रकरणात आम्ही नागपूरच्याच तुरुंगात टाकू, असे खळबळजनक वक्तव्य भाीरप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले. नागपुरात वंचित बहुजन आघाडीतर्फे अर्थव्यवस्था अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे जाहीर सभेदरम्यान ते बोलत होते.
या सभेला ‘एआयएमआयएम’चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी हेदेखील येणार होते. संघभूमीत येऊन ओवेसी काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचेदेखील लक्ष लागले होते. मात्र ओवेसी हे अखेरपर्यंत आलेच नाही.
त्यांच्या अनुपस्थितीत आ.वारीस पठाण व आ.इम्तियाज जलील हे उपस्थित होते. एखाद्या व्यक्तीकडे चाकू सापडला की त्याच्याविरोधात त्वरित गुन्हा दाखल करण्यात येतो. विजयादशमीच्या दिवशी सरसंघचालक तर खुलेआमपणे एके-५६ ची पूजा करतात. मग त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात विलंब का होत आहे असा प्रश्न आंबेडकर यांनी उपस्थित केला. जर सरकारने गुन्हा दाखल केला नाही तर सरकारदेखील सहआरोपी होईल, असे ते म्हणाले. काँग्रेस व भाजप दोन्ही पक्षांना नक्षलग्रस्त भागातील खनिजसंपत्ती लुटायची आहे. म्हणून सलवाजुडुम राबविण्यात आला, असा आरोपदेखील त्यांनी केला.
‘आरबीआय’ इतिहासजमा करायची आहे का ?
ऊर्जित पटेल यांच्या जागी ‘आरबीआय गव्हर्नर’ म्हणून शक्तिकांत दास यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र दास हे प्रत्यक्षात इतिहासाचे पदवीधर आहेत. मग त्यांना आरबीआयचे गव्हर्नर का केले ही कोड्यात टाकणारी बाब आहे. संघ आरबीआयला इतिहासजमा करायला निघाला आहे का, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.
अशोक चव्हाणांकडे अधिकारच नाहीत
यावेळी आंबेडकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनादेखील चिमटा काढला. काँग्रेसला आमच्याशी आघाडी करायची आहे, पण त्यांना ‘एआयएमआयएम’ चालत नाही. याच ‘एआयएमआयएम’च्या खासदाराचे मत त्यांनी अणुकराराच्या वेळी अडचणीत का घेतले होते? चव्हाणांनी चारवेळा बोलाविले. मात्र त्यांच्याकडे आघाडी करण्याचे केंद्रीय नेतृत्वाने अधिकार दिले आहेत का, याचे उत्तर त्यांनी अद्याप दिलेले नाही. काँग्रेसला आम्ही हवे असू तर ‘एआयएमआयएम’लादेखील सोबत घ्यावेच लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सभेला तीन तास विलंब
कार्यक्रमपत्रिकेत सभेची वेळ दुपारी २ ची देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात ५ नंतर सभेला सुरुवात झाली. त्यातही मंचावर सुमारे २० जणांची भाषणे झाली. त्यानंतर आंबेडकर यांच्या भाषणाला सुरुवात झाली. नेत्यांच्या भाषणातून काँग्रेससोबत आघाडी नको, असा सूर दिसून आला. शिवाय आंबेडकर यांनी नागपुरातून लोकसभेची निवडणूक लढवावी, अशी मागणी महासचिव गुणवंत देवपारे यांनी केली. यावेळी सागर डबरासे, राजू लोखंडे, रवी शेंडे, किरण पाटणकर, निशा शेंडे, वनमाला उके, कमलेश भगतकर, कुशल मेश्राम, जीवन गायकवाड, रमेश पाटील, नजमुन्नीसा बेगम, श्रद्धा चव्हाण, विजय मोटे इत्यादी उपस्थित होते.