भिवापूर : तालुक्यातील वासी येथील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा सुरू आहे. त्यामुळे नदीपात्रात खोलवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे रेतीचा अवैध उपसा व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करावी. अशी मागणी होत आहे.
तालुक्यातील विविध गावखेड्यात सध्या शासकीय योजनातून घरकुलाचे व स्वखर्चातून घरांचे बांधकाम सुरू आहे. घरबांधकामासाठी लगतच्या पवनी येथील वैनगंगा नदीपात्रातील रेतीला मोठी मागणी आहे. मात्र तिथेही कुठे रेतीघाट बंद तर कुठे चोरीचा मामला थांबला असल्यामुळे रेतीचे दर वाढले आहेत. परिणामी, सामान्य नागरिकांना पवनीची रेती मिळणे व मिळाली तरी ती महागड्या दरात खरेदी करणे झेपणारे नाही. त्यामुळे अनेकांनी आपल्या घराच्या बांधकामासाठी गावशिवारातील नदीपात्राची निवड केली आहे. रेतीची वाहतूक करणारे ट्रॅक्टर मालक व चालक स्थानिक नदीपात्रातील रेती कमी दरात आणि पाहिजे त्या वेळेत उपलब्ध करून देतात. मात्र या चोरट्या धंद्याकडे कुणीच लक्ष देत नसल्यामुळे तालुक्यातील अनेक नद्यांचे विद्रुपीकरण होत आहे. दुसरीकडे या अवैध उपशामुळे शासनाचा महसूलसुद्धा बुडत आहे. नांद शिवारातसुद्धा रेतीचा उपसा व वाहतूक बेधडक सुरू असल्याचे समजते.
--
ग्रा.पं. सदस्याची पोलिसात तक्रार
गत दोन दिवसापूर्वी सायंकाळच्या सुमारास अशाच प्रकारे वासी नदीच्या पात्रात रेतीचा अवैध उपसा सुरू होता. दरम्यान ग्रा.पं. सदस्य सुभाष उईके यांना हा प्रकार दिसताच त्यांनी रेतीचा उपसा करणाऱ्यास हटकले. यावेळी ट्रॅक्टर चालकाने सुभाष उईके यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. यादरम्यान घटनास्थळी आलेल्या कोतवालानेसुद्धा रेतीचोरट्याची पाठराखण करीत उईके यांना शिवीगाळ केली. याप्रकरणी उईके यांनी पोलिसात तक्रार नोंदविली आहे.