लोकमत विशेष दोषी अधिकारी मोकाट : शेतकर्यांची न्यायासाठी वणवणजीवन रामावत नागपूर : वन अधिकार्यांच्या मर्जीने एका ठेकेदाराने शेतकर्याच्या शेतातील सागाच्या झाडांची अवैध कटाई केल्याची घटना पुढे आली आहे. असे असताना, अख्खा वन विभाग मात्र गत चार महिन्यांपासून गप्प बसला आहे. अमोल हेमंतराव हिवसे रा. सबकुंड ता. काटोल असे त्या शेतकर्याचे नाव आहे. या शेतकर्याची मौजा कोकारडा (रिठी) येथे सर्वे क्र. १४२ ही शेती आहे. शिवाय त्यांच्याशेजारी जानराव नथ्थूजी हिवसे यांच्या मालकीचे सर्वे क्र. १४१ हे शेत आहे. माहिती सूत्रानुसार जानराव हिवसे यांनी त्यांच्या शेतातील काही सागाची झाडे हिरुळकर नावाच्या एका ठेकेदाराला विकली होती. त्यानुसार ती झाडे तोडण्यासाठी वन विभागाकडे परवानगी मागण्यात आली. त्यावर वन विभागाचे क्षेत्र सहायक आर. जे. डाखोळे यांनी मौका पंचनामा करून झाडे तोडण्याची परवानगी दिली. परंतु ठेकेदाराने जानराव हिवसे यांच्या शेतातील झाडांसह शेजारच्या अमोल हिवसे यांच्या शेतातील २७, ३६, ५२, व ५४ क्रमांकाच्या चार सागवनाच्या झाडांची अवैध कटाई केली. सोबतच त्या झाडांच्या वाहतुकीसाठी रहदारी परवान्यासाठी वन विभागाकडे अर्ज करण्यात आला. त्यावर संबंधित वन अधिकार्यांनी पुन्हा मौका पंचनामा करून,जानराव हिवसे यांच्या शेतातील झाडांसोबतच अमोल हिवसे यांच्या शेतातील झाडांवरही आयव्ही ३६८ क्रमांकाचा हँमर मारून वाहतूक परवाना जारी केला. परंतु अमोल हिवसे यांच्या ही बाब लक्षात येताच, त्यांनी लगेच संबंधित वन अधिकार्यांकडे तक्रार करून त्यावर आक्षेप घेतला. परंतु त्यांच्या त्या तक्रारीची कुणीही दखल घेतली नाही. त्यामुळे अमोल हिवसे यांनी सहायक वनसंरक्षक जे. बी. चोपकर यांच्यासह उपवनसंरक्षक पी. के. महाजन, नागपूर सर्कलचे मुख्य वनसंरक्षक व प्रधान मुख्य वनसंरक्षकांपर्यंत धाव घेतली. पण गत चार महिन्यांपासून त्यांना कुठेही न्याय मिळाला नाही.
शेतकर्याच्या शेतातील सागाची अवैध कटाई!
By admin | Published: May 03, 2014 1:23 PM