अवैध होर्डिंग्ज ; नागपुरात ४६ जणांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 11:58 PM2018-01-29T23:58:28+5:302018-01-30T00:02:15+5:30
शहरात कोणत्याही भागात अवैध होर्डिंग, बॅनर लावण्यात येऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. त्यानंतरही शहराच्या विविध भागात अवैध होर्डिंगची भरमार आहे. गेल्या वर्षभरात १९५१ अवैध होर्डिंग्ज, बॅनर हटवून पोलिसात ४६ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात कोणत्याही भागात अवैध होर्डिंग, बॅनर लावण्यात येऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. त्यानंतरही शहराच्या विविध भागात अवैध होर्डिंगची भरमार आहे. गेल्या वर्षभरात १९५१ अवैध होर्डिंग्ज, बॅनर हटवून पोलिसात ४६ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शहरात ठिकठिकाणी अवैध होर्डिंग आणि बॅनर लागल्याचे चित्र आहे़ यामुळे शहर विद्रूप होत आहे़ यासंदर्भात एक जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती़ न्यायालयाने अवैध होर्डिंग्जची यादी सादर करण्याचे आदेश याचिकाकर्ता आणि
महापालिकेला दिले. अवैध होर्डिंग्ज, पोस्टर्स, बॅनर्स लावणारे विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, जाहिरात एजन्सीज, शुभेच्छा देणारे फलक अशा सर्वांच्या नावाची यादी सादर करावी आणि संबंधित राजकीय पक्ष, एजन्सीज यांच्या नावांची यादी मिळाल्यानंतर त्यांना अवमानना प्रकरणात प्रतिवादी करावे, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले होते़ दरम्यान, न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेने होर्डिंग, प्लेक्स, बॅनर हटविण्याची प्रक्रिया सुरू केली़ गेल्या वर्षात १० झोनमध्ये ४६ गुन्हे दाखल करण्यात आले़ यात सर्वाधिक प्रकरणे मंगळवारी झोनमधील आहेत़
अवैध होर्डिंग लावणाऱ्यांवर १०० रुपये प्रति दिवस यानुसार दंड आकारणी केली जाते़ अवैध होर्डिंग विरोधात कारवाई करण्याची जबाबदारी झोनमधील अधिकाऱ्यांना सोपविण्यात आली आहे़ मात्र झोनमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे ती जबाबदारी आरोग्य विभागासह अन्य विभागातील कर्मचाऱ्यांकडे आता देण्यात आली़ वर्षभरात अवैध होर्डिंग लावणाऱ्यांकडून १ लाख ९१ हजार ९७० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला़ २० चौरस फुटाहून मोठे होर्डिंग लावणाऱ्या दुकानदारांच्या विरोधातही कारवाई केली जाणार आहे.
मेट्रोमुळे मनपाचे उत्पन्न बुडाले
शहरात प्रमुख रस्त्यावर मोठमोठे होर्डिंग लावलेले असतात़ शुल्क आकारून महापालिका मोठे होर्डिंग लावण्यास परवानगी देते़ मात्र, मेट्रो रेल्वेच्या कामामुळे जाहिरात विभागाचे उत्पन्न बुडत आहे. एकट्या वर्धा रोडवर मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे मोठ्या होर्डिंगच्या माध्यमातून मिळणारे ६० लाखांचे उत्पन्न बुडाले आहे.