नागपुरात अवैध दारू विक्रेत्यांची युवकाला बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 10:34 PM2020-04-20T22:34:21+5:302020-04-20T22:35:14+5:30
अवैध दारूविक्रीची पोलिसांना माहिती दिल्याच्या संशयावरून दारूविक्रेत्यांनी एका युवकाला बेदम मारहाण केली. पाच दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेची तक्रार युवकाच्या आईने रविवारी पारडी पोलिस ठाण्यात नोंदविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अवैध दारूविक्रीची पोलिसांना माहिती दिल्याच्या संशयावरून दारूविक्रेत्यांनी एका युवकाला बेदम मारहाण केली. पाच दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेची तक्रार युवकाच्या आईने रविवारी पारडी पोलिस ठाण्यात नोंदविली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
राजू सोनीलाल सीधुरिया (रा. बिडगाव), आकाश चिंतामण मेश्राम (रा. स्वागतनगर) अशी या घटनेतील मुख्य आरोपींची नावे आहेत. भांडेवाडी, पारडी येथील रहिवासी सारिका सुभाष ठवकर (वय ३५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा १६ वर्षीय मुलगा सौरभ १५ एप्रिलच्या रात्री घरगुती सामान आणायला बाजारात गेला होता. आरोपी राजू सिधुरिया, आकाश मेश्राम यांनी त्याला नागेश्वर नगरातील मंगळवार बाजारात नेले. तेथे आरोपी राजू, आकाश आणि त्यांच्या चार ते पाच साथीदारांनी सौरभला बेदम मारहाण केली. आरोपीच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर सौरभ कसाबसा घरी पोहचला. त्याने ही घटना आपल्या आईला सांगितली. मारहाणीमुळे संपूर्ण ठवकर कुटुंब प्रचंड दहशतीत आले. त्यांनी याबाबत कुठे वाच्यता न करता गप्पच राहणे पसंत केले. मात्र या मारहाणीच्या घटनेची कुणकूण शेजाऱ्यांना लागल्यानंतर त्यांनी ठवकर कुटुंबातील सदस्यांना दिलासा देऊन तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे रविवारी सारिका ठवकर यांनी पारडी पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपी राजू , आकाश आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.
आरोपींचा पारडी भागात अवैध दारूविक्रीचा व्यवसाय आहे. त्याची माहिती काही दिवसांपूर्वी पोलिसांना मिळाल्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली होती. ही माहिती सौरभने पोलिसांना दिली, असा आरोपींना संशय होता. त्यामुळे त्यांनी त्याला मारहाण केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.