गांडुळ खत प्रकल्पातून साधली उन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:08 AM2021-02-08T04:08:54+5:302021-02-08T04:08:54+5:30
विजय नागपुरे लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी शेती हा प्रमुख व्यवसाय. त्यातही शेती म्हटले तर अस्मानी ...
विजय नागपुरे
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी शेती हा प्रमुख व्यवसाय. त्यातही शेती म्हटले तर अस्मानी व सुल्तानी संकटांना सामोरे जावे लागते. त्यामुळेच आज अनेक तरुण शेती व्यवसाय सोडून नोकरी मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात. मात्र यास अपवाद ठरत तालुक्यातील घोराड येथील शेतकरी कुटुंबातील शरद झाडे या तरुणाने उद्याेगाकडे वाटचाल सुरू केली आहे. नोकरीच्या मागे न धावता शेणखतापासून गांडुळ खत तयार करण्याचा प्रकल्प त्याने उभारला.
शरद झाडे यांनी कृषी तंत्रज्ञान विद्यालय सावंगी (तोमर) येथून कृषी पदविकेचे शिक्षण पूर्ण केले. नोकरीची आशा न बाळगता या तरुणाने स्वतःचा गांडुळ खत प्रकल्प मागील सहा वर्षांपूर्वी सुरू केला. घरी एक एकर शेती असल्याने शरदचे मोठे भाऊ दीपक झाडे यांनी दुग्धव्यवसाय उभारला. याकरिता १५ गाई खरेदी केल्या. या गाईपासून मिळणाऱ्या शेणखतापासून शरदने गांडुळ खत तयार करण्याचे ठरविले. यासाठी त्याने शेड बनवून त्यामध्ये शेणखत व गांडुळ खत टाकले. त्याला ३५ ते ४० दिवस ओलावा देत राहिल्यास गांडुळ खत तयार होते. एका महिन्यात जवळपास १० टन गांडुळ खत तयार करण्यात येत असून, ते ८ ते १० रुपये किलोप्रमाणे विकले जाते.
तालुक्यातील संत्रा बागायतदार शेतकरी तसेच घोराड, उबाळी परिसरात असलेल्या फूल नर्सरी चालक तसेच भाजीपाला उत्पादक शेतकरी गांडुळ खत मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. त्यामुळे गांडुळ खत विक्रीसाठी त्रास हाेत नसल्याचे त्यांनी सांगितले. गांडुळ खत बनविताना शेणखतात ओलावा राहावा म्हणून टाकण्यात येणाऱ्या पाण्यापासून तयार होणारे वर्मीवाॅशसुद्धा १० रुपये लिटरप्रमाणे विकल्या जाते. वर्मीवाॅश महिन्याकाठी एक हजार लिटरचे जवळपास तयार होते. इतर तरुणांनीही यातून प्रेरणा घेऊन स्वतःची उन्नती साधावी, असे आवाहन त्यांनी केले.
....
सुशिक्षित तरुणांनी नोकरी न लागल्यामुळे निराश न होता स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. नोकरीपेक्षाही चांगले उत्पादन या गांडुळ खतासारख्या व्यवसायातून घेता येते.
- शरद झाडे, घोराड, ता. कळमेश्वर