नागपूर : रुईखैरी परिसरातून वाहणाऱ्या वणा (वेणा) नदीच्या पात्रात गुरुवारी (दि. ७) २५ ते ३० वर्षे वयाेगटातील तरुण व तरुणीचे मृतदेह आढळून आले. त्या दाेघांची आधी हत्या करण्यात आली. त्यानंतर दाेन्ही मृतदेह नाॅयलाॅन दाेरीने दगडासह एकत्र बांधून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने नदी फेकल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या दाेघांचीही अद्याप ओळख पटली नाही.
रुईखैरी शिवारात या नदीवर माेठा आणि छाेटा असे दाेन पूल आहेत. या पुलाजवळ गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास दाेन्ही मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून दाेन्ही मृतदेह बाहेर काढले व उत्तरीय तपासणीसाठी नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये पाठविले.
दाेघेही २५ ते ३० वर्षे वयाेगटातील असून, दाेघांनाही पिवळ्या रंगाच्या एकाच नाॅयलाॅन दाेरीने बांधले हाेते. त्याच दाेरीच्या एका टाेकाला अंदाजे २५ किलाे वजनाचा माेठा चाैकाेनी दगड बांधला हाेता. अप्पर पाेलीस अधीक्षक राहुल माकनीकर, उपविभागीय पाेलीस अधिकारी पूजा गायकवाड यांनी घटनास्थळ व मृतदेहांची पाहणी केली. दाेघांचाही खून करण्यात आला असून, त्यांचे मृतदेह नदीत फेकण्यात आल्याचे या दाेन्ही अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणात गुन्हा नाेंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, बुटीबाेरीचे ठाणेदार भीमाजी पाटील करीत आहेत.
दाेघांच्याही हातावर ‘यूएस’ गाेंदलेले
मृत तरुण सावळ्या वर्णाचा असून, त्याने लाल, काळा व निळ्या रंगाचे पट्टे असलेले पूर्ण बाह्यांचे टी शर्ट तसेच काळी जिन्स पॅन्ट परिधान केली आहे. त्याच्या उजव्या हातावर इंग्रजीत यूएस व मराठीत उत्तम गाेंदले आहे. तरुणीचा वर्ण गाेरा असून, तिने तपकिरी रंगाचे ब्लाऊज, पिवळ्या रंगाची चाैकडे असलेली साडी, काळा पेटीकाेट परिधान केला आहे. तिच्या उजव्या हातावर इंग्रजीत यूएस गाेंदले आहे. दाेघांच्याही हातावर सारखी अक्षरे गाेंदलेली आहेत. तरुणाचे नाव उत्तम तर तरुणीचे नाव एस या अक्षरापासून सुरू हाेत असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
दाेघेही कामगार असावेत. त्यांना वेणा नदीवरील माेठ्या पुलावरून फेकले असते तर त्यांचे हातपाय फ्रॅक्चर झाले असते. त्यांच्या हातापायांवर जखमा अथवा फ्रॅक्चर नसल्याने त्यांना छाेट्या पुलावरून फेकले असावे. आराेपींनी हा प्रकार घटना उघड हाेण्याच्या आठ तास आधी केला असावा. या प्रकरणात खुनाचा गुन्हा नाेंदविला जाईल व आराेपीला लवकरच अटक केली जाईल.
- राहुल माकनीकर, अप्पर पाेलीस अधीक्षक, नागपूर (ग्रामीण)