मृत्यू गाठला वेशीवर, धीर कोणा कोणा देऊ! सहा जणांच्या अंत्ययात्रेत सारा गणगोत गहिवरला
By जितेंद्र ढवळे | Published: December 16, 2023 09:13 PM2023-12-16T21:13:18+5:302023-12-16T21:14:26+5:30
सोनखांब अपघातातील मृतांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार...
नागपूर (काटोल) : ‘होत्याचं नव्हतं झालं’ असे जे म्हणतात, अगदी तशाच घटनेचा सामना मेंढेपठार येथील गावकऱ्यांना करावा लागला आहे. गावातील मुलीला थाटामाटात विदाई दिल्यानंतर, तिच्या सासरी झालेल्या स्वागत समारंभाहून परतताना झालेल्या अपघातात गावातील सहा जणांना मृत्यूने गाठले. आनंदाचे रूपांतरण शोककळेत झाले. त्यांची अंत्ययात्रा निघाली, तेव्हा कोणाकोणाचे सांत्वन करावे, असा अनुत्तरित प्रश्न गावकऱ्यांच्या पाणावलेल्या डोळ्यांत आणि दु:खाने माखलेल्या चेहऱ्यावर दिसून येत होता. अख्खा गणगोत व्यक्तही होऊ शकत नव्हता आणि स्वत:ला सांभाळूही शकत नव्हता.
शुक्रवारी (दि. १५) मध्यरात्री नागपूर येथे पार पडलेल्या स्वागत समारंभातून परतताना नागपूर-काटोल मार्गावरील सोनखांब शिवारात गावकऱ्यांनी भरलेली क्वॉलिस आणि समोरून येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक झाली. यात क्वालिसमधील मेंढेपठार येथील सहा जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यात वाहन चालक मयूर मोरेश्वर इंगळे (२५), सुधाकर रामचंद्र मानकर (४०), विठ्ठल दिगंबर थोटे (४०), रमेश ओमकार हेलोंडे (५०), वैभव साहेबराव चिखले (३२), अजय दशरथ चिखले (४०) यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच, शनिवारी सकाळपासूनच नातेवाईक आणि गावकऱ्यांची गर्दी मृतांच्या अंतिम दर्शनासाठी उसळली होती. गावावर ओढावलेल्या या शोककळेमुळे एकाही घरात चूल पेटली नाही. दुपारी २ वाजताच्या सुमारास सर्वांचे पार्थिव मेंढेपठारला आणण्यात आले. त्यावेळी मृतांच्या कुटुंबीयांनी फोडलेला हंबरडा आभाळ फाटावा, असाच होता. नातेवाईक ज्याचे, त्याचे होतेच, परंतु गावातील प्रत्येक नागरिकांसाठी सहाही चेहरे रोजचेच होते आणि ते पुन्हा कधीही दिसणार नव्हते. त्यामुळे ते भांबावलेले होते. याचे सांत्वन करू की त्याचे सांत्वन करू, अशा स्थितीत तो स्वत:लाही धीर कसा देऊ, अशा मानसिकतेत होता. सहाही पार्थिवांवर गावातील स्मशानभूमीत एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले, तेव्हा घराकडे परतणारी पावलेही गारठली होती.
सहाही जण होते कुटुंबाचा आधार
- वैभव साहेबराव चिखले : एका वर्षापूर्वी लग्न झालेल्या वैभव यांना महिन्याभरापूर्वी मुलगी झाली होती. तिचे नामकरणही झाले होते. मात्र, जगण्याचे भान येण्यापूर्वीच ती वडिलांपासून पोरकी झाली. पत्नी बाळंतीण अवस्थेत असल्याने, तिच्या वेदना व्यक्त करणे अवघड आहे. आताच थाटलेला संसार जेमतेम फुलायला लागला होता आणि त्यातच काळाने घाला घातल्याने, ते नि:शब्द झाले आहे.
- मयूर मोरेश्वर इंगळे : मयूर हा स्कूलबस चालवत होता. तो एकुलता एक मुलगा होता. घर सांभाळण्याची जबाबदारी त्याचीच होती. लग्नासाठी मुलगी बघणे सुरू होते. मुलाच्या आनंदी संसाराचे स्वप्न बघणाऱ्या त्याच्या आई-वडिलांना त्याचे पार्थिवच बघावे लागल्याने, त्यांच्या वेदना काळीज पिळवटून टाकणाऱ्या होत्या.
- सुधाकर रामचंद्र मानकर : सुधाकर चंद्रपूर कोलमाइन्समध्ये नोकरीला होते. लग्नासाठीच ते गावात आले होते. त्यांच्यापश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे. सुधाकर गेल्याने तिघा मायलेकांची स्थिती अत्यंत विदारक होती. नातेवाईक त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत होते.
- विठ्ठल दिगंबर थोटे : ऑटो चालवून घराचा गाडा हाकणाऱ्या विठ्ठल यांना पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आहे. मात्र, त्यांच्या संसाराला नजर लागली. त्यांच्या वडिलांचे अश्रू तर थांबता थांबत नव्हते.
- रमेश ओमकार हेलोंडे : शेती करून प्रपंच चालविणाऱ्या रमेश यांच्या जाण्याने, त्यांचे शिक्षण घेणारी दोन्ही मुले वडिलांच्या छत्रछायेपासून वंचित झाली आहेत. पत्नीचा आधार गेल्याने तिची शुद्ध हरपल्यागत झाली होती. नातेवाईक तिला धीर देण्याचा प्रयत्न करत होते.
- अजय दशरथ चिखले : दोन मुलांचा बाप असलेल्या अजय यांची संपूर्ण मदार शेतीवर होती. कार्यक्रम आटोपून लवकर येतो, असे सांगून गेलेल्या बापाचा मृतदेह बघून मुलांनी आणि त्यांच्या पत्नीचा हंबरडा मन हेलावून सोडणारा होता. तिरडीपुढे आक्टं घेऊन चालणाऱ्या दहा वर्षांच्या मुलाकडे बघून, सर्वांच्या चेहऱ्यावरचे भाव विषण्ण करणारे होते.