नागपूर रेल्वेस्थानकावर आत्मा : मशीन तापमान मोजणार अन् तिकीटही तपासणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 08:17 PM2020-06-05T20:17:50+5:302020-06-05T21:13:46+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत रेल्वेस्थानकावर आत्मा(ऑटोमेटेड तिकीट चेकिंग अॅन्ड मॅनेजिंग अॅसेस)चा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यानुसार रेल्वेस्थानकावर लावलेल्या मशीनच्या साहाय्यानेच प्रवाशाचे तापमान, त्याने मास्क घातला आहे की नाही आणि प्रवासाचे तिकीट तपासण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत रेल्वेस्थानकावर आत्मा(ऑटोमेटेड तिकीट चेकिंग अॅन्ड मॅनेजिंग अॅसेस)चा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यानुसार रेल्वेस्थानकावर लावलेल्या मशीनच्या साहाय्यानेच प्रवाशाचे तापमान, त्याने मास्क घातला आहे की नाही आणि प्रवासाचे तिकीट तपासण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात आत्मा यंत्रणेचा शुभारंभ मेसर्स इजी स्ट्रीटच्या सहकार्याने करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने या कंपनीशी करार केला आहे. यात ‘सोशल डिस्टन्सिंग’ ठेवणे शक्य होणार आहे. या यंत्रणेत प्रवासी रेल्वेस्थानकावर आल्यानंतर या मशीनच्या समोर उभा राहील. मशीनच्याा ह्युमन थर्मलशी संपर्क केल्यानंतर संबंधित प्रवाशाच्या शरीराचे तापमान मशीनद्वारे मोजण्यात येईल. त्यानंतर मशीनच फेस मास्क आहे की नाही आणि तिकिटाची तपासणीही दुरूनच करणार आहे. सर्व बाबी ठीक असल्यास बाजूला बसलेले रेल्वे कर्मचारी संबंधित प्रवाशास रेल्वेस्थानकाच्या आत प्रवेश करण्याबाबत ध्वनिक्षेपकावरून सूचना देणार आहेत. या मशीनवर रेल्वे सुरक्षा दलाचे जवानही लक्ष ठेवणार आहेत. रेल्वेस्थानकावर ऑटोमॅटिक विद्युत प्रवेशद्वारातून प्रवाशांना रेल्वेस्थानकाच्या आत जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे. आत्माच्या शुभारंभ प्रसंगी विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील, विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पाण्ड्येय, सहायक वाणिज्य व्यवस्थापक विजय थुल, वाणिज्य निरीक्षक ताराप्रसाद आचार्य उपस्थित होते. अशा प्रकारच्या आणखी तीन मशीन रेल्वे प्रशासनाच्यावतीने लावण्यात येणार आहेत.