लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत बौद्ध विचारधारेच्या अध्ययनाला सखोलता प्राप्त व्हावी याकरिता विद्यापीठ अनुदान आयोगाने १० वर्षांअगोदर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत ‘बुद्धिस्ट स्टडी सेंटर’ स्थापन करण्यास मंजुरी दिली होती. त्यानंतर अनेक अडचणींचा सामना करत अखेर हे केंद्र तयार झाले आहे. २८ एप्रिल रोजी ‘बुद्धिस्ट स्टडी सेंटर’चे उद्घाटन होणार आहे. या केंद्रामुळे बौद्ध विचार अध्ययनात नागपुरची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख होणार आहे. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी पत्रपरिषदेदरम्यान ही माहिती दिली.२८ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘बुद्धिस्ट स्टडी सेंटर’चे उद्घाटन होणार आहे. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, उर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ.जोगेंद्र कवाडे, बौद्ध विचारवंत भदंत विमलकित्ती गुणसिरी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. डॉ.काणे हे अध्यक्षस्थान भूषवतील तर प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांची प्रमुख उपस्थिती असेल. ‘बुद्धिस्ट स्टडी सेंटर’मध्ये ग्रंथालय, वाचनकक्ष, संगणककक्षदेखील आहे. सोबतच कार्यक्रमांच्या आयोजनासाठी सेमिनार हॉलचीदेखील निर्मिती करण्यात आली आहे. एकूण ५ कोटी ४७ लाख एवढा खर्च करून ही वास्तू उभारण्यात आली आहे, अशी माहिती डॉ.काणे यांनी दिली. पत्रपरिषदेला कुलसचिव डॉ.पूरण मेश्राम, माध्यम समन्वयक डॉ.श्याम धोंड प्रामुख्याने उपस्थित होते.
अडथळ्यांचा करावा लागला सामनाडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचे केंद्र असलेल्या नागपुरात बौद्ध विचाराधारेच्या अभ्यासासाठी देशविदेशातून विद्यार्थी येतात. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने येथे ‘बुद्धिस्ट स्टडी सेंटर’ स्थापन करण्यासाठी मंजुरी दिली. ११ व्या पंचवार्षिक योजनेत यासाठी २ कोटी रुपयांचे अनुदानदेखील प्राप्त झाले होते. दरम्यान, सुरुवातीला जागेवरून संभ्रम निर्माण झाला होता. अखेर रामदासपेठ येथील विद्यापीठ ग्रंथालयाजवळील मोकळ््या भूखंडावर हे सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु या जागेवर वृक्ष होते व त्यांना कापण्यावरून वाद निर्माण झाला होता. विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ.अनिल हिरेखण यांच्या प्रयत्नांनंतर मनपाने यासाठी परवानगी दिली. मात्र तरीदेखील बांधकामाला सुरुवात झाली नव्हती. ‘लोकमत’नेदेखील हा मुद्दा लावून धरला. अखेर २०१५ साली बुद्धपौर्णिमेच्या दिवशी केंद्रीय भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले होते.अध्ययनाला बळ मिळणारडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुरात धम्मदीक्षा देऊन नागपूरला जागतिक महत्त्व प्राप्त करून दिले. त्यामुळे जगातील बौद्ध तत्त्वज्ञानाचे संशोधक व अभ्यासक नागपूरचे आकर्षण असून अनेक संशोधक विद्यार्थी नागपूर विद्यापीठात संशोधन करण्यास उत्सुक आहेत. परंतु, नागपुरात सुसज्ज व सर्व सुविधायुक्त बौद्ध अध्ययन केंद्र नसल्याने विदेशी विद्यार्थी नागपुरात येत नाही.बौद्ध-आंबेडकरी विचारधारा व संस्कृतीच्या अभ्यासासाठी नागपूर विद्यापीठात पाली-प्राकृत विभाग, आंबेडकर विचारधारा विभाग आणि डॉ. आंबेडकर अध्यासन आहेत. आता बुद्धिस्ट स्टडी सेंटर येत असल्याने बौद्ध विचारधारेच्या अध्ययनाला निश्चितच बळ मिळणार आहे.