सीताबर्डी पोलीस ठाण्यात चाईल्ड फ्रेण्डली झोनचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:08 AM2021-07-31T04:08:41+5:302021-07-31T04:08:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - स्मार्ट पोलीस स्टेशनच्या संकल्पनेनुसार निर्माण करण्यात आलेल्या सीताबर्डी पोलीस ठाण्यातील चाईल्ड फ्रेण्डली झोन (बालस्नेही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - स्मार्ट पोलीस स्टेशनच्या संकल्पनेनुसार निर्माण करण्यात आलेल्या सीताबर्डी पोलीस ठाण्यातील चाईल्ड फ्रेण्डली झोन (बालस्नेही कक्ष) चा लोकार्पण सोहळा अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. दिलीप झळके यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता पार पडला. यावेळी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, नवीनचंद्र रेड्डी प्रामुख्याने उपस्थित होते.
वेगवेगळ्या कारणांमुळे महिला पोलीस ठाण्यात येतात. तेथे त्यांची लहानगी कावरीबावरी होतात. अनेक बालकं रडून गोंधळ घालतात. त्यामुळे महिलांना जबाब देणे, तक्रार नोंदविणे अडचणीचे ठरते. हरविलेल्या बालकांबाबतही असेच होते. त्याचप्रमाणे अनेक महिला पोलिसांना छोटी मुलं असतात. त्यांना घरी सांभाळण्यासाठी कुणी नसते. त्यामुळे त्यांची आबाळ होते. ही अडचण लक्षात घेऊन परिमंडळ दोनच्या उपायुक्त विनिता साहू यांनी पोलीस ठाण्यात लहानग्यांसाठी एक कक्ष तयार करण्याची संकल्पना मांडली. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी त्याला मान्यता दिल्यानंतर ठाणेदार अतुल सबनीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात एक स्वतंत्र बालस्नेही कक्ष तयार करून घेतला. येथे लहान मुलांसाठी पुस्तके, विविध प्रकारची खेळणी, घसरगुंडी, पाळणा, बसविण्यात आला आहे. महिलांसाठी विश्रांती आणि चेंजिंग रूमचीही व्यवस्था आहे. ‘नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईटस्’च्या मार्गदर्शक तत्वानुसार हा कक्ष निर्माण करण्यात आला असून त्याचा लोकार्पण सोहळा अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. दिलीप झळके यांच्या हस्ते आज पार पडला. कार्यक्रमाचे संचालन पीएसआय माया भोसले आणि आभार प्रदर्शन सहायक आयुक्त तृप्ती जाधव यांनी केले.
---
डॉ. झळके यांचा सेवाकाळ पूर्ण
अतिरिक्त आयुक्त डॉ. झळके यांचा आज पोलीस दलातील सेवेचा शेवटचा दिवस होता. डॉक्टर म्हणून सेवा देताना ते एमपीएससीच्या माध्यमातून थेट डीवायएसपी म्हणून पोलीस दलात रुजू झाले. त्यानंतर त्यांनी गडचिरोली-गोंदियाच्या नक्षलग्रस्त भागात, भंडारा, नागपूर, परभणी, सोलापूर, औरंगाबाद येथे सेवा दिली. दीड वर्षांपासून ते नागपुरात कार्यरत आहेत. एक ‘दबंग पोलीस अधिकारी’ म्हणून ते ओळखले जातात. कार्यक्रमादरम्यान ते आज काहीसे भावूक झाले होते. सेवासमारोपाच्या दिवशी एका भावनिक आणि प्रशंसनीय उपक्रमाच्या उद्घाटनाचा योग आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पोलीस जिमखान्यात झालेल्या क्राईम मिटिंगनंतर त्यांचा निरोप समारंभ पार पडला. त्यांच्या सेवाकार्याची यावेळी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशंसा करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
----