नागपूर : न्यू ईरा हॉस्पिटल व रिसर्च इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने नागपूरच्या मध्यवर्ती रेल्वेस्थानकावर ‘२४ बाय ७’ आपत्कालीन वैद्यकीय सेवेसह ‘मिनी आयसीयू’ व औषधी स्टोअरला शुक्रवारपासून सुरुवात झाली. या सेवेचे उद्घाटन विभागीय रेल्वे व्यवस्थापक ऋचा खरे, लोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन व राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा, पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी न्यू ईरा हॉस्पिटलचे संचालक डॉ. आनंद संचेती, डॉ. नीलेश अग्रवाल, डॉ. निधीश मिश्रा व उज्ज्वल पागरिया आदी उपस्थित होते. मध्यभारतात पहिल्यांदाच रेल्वेस्थानकावर उपलब्ध झालेल्या या वैद्यकीय सेवेचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
नागपूर शहर मध्य भारताचे मेडिकल हब म्हणून ओळखले जाते. येथे केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर मध्यप्रदेश, छत्तीसगडमधूनही रोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात. अशात ज्या रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी ‘गोल्डन अवर’ची जी वेळ असते त्या वेळेत त्याला तत्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्यास त्या रुग्णाचा जीव वाचतो. त्याच धर्तीवर रेल्वेस्थानकावर मिनी आयसीयू, आपत्कालीन वैद्यकीय सेवा व औषधी स्टोअर सुरू करण्यात आले. याची संपूर्ण जबाबदारी न्यू ईरा हॉस्पिटलने आपल्याकडे घेत फ्लॅटफॉर्म नंबर-१ वर ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. येथे बाहेरच्या रुग्णासोबतच प्लॅटफॉर्मवरचे प्रवासी उपचार घेऊ शकतात. येथे प्रवासी रुग्णांना केवळ १०० रुपये नाममात्र शुल्कात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक जयसिंग, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक पी.एस. खैरकर, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंपक बिस्वास, वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक कृष्णनाथ पाटील यांच्यासह राजेंद्र संचेती, डॉ. वाघेश कटारिया, अतुल कोटेचा, सुभाष कोटेचा, दिलीप राका, संजय कोठारी, विशाल गोलछा, मनीष छल्लानी, संजय पुगलिया, श्रेयांश पगारिया, प्रदीप कोठारी आदींची उपस्थिती होती.
- ‘डॉक्टर ऑन कॉल’ सुविधा
नागपूर रेल्वेस्थानकावर येणाऱ्या प्रवाशाला तातडीची वैद्यकीय सेवा हवी असल्यास त्याने ‘८८९५६९८८७११’ किंवा ‘७८८८०३६४०८’ या हेल्प लाइन नंबरवर कॉल केल्यास संबंधित प्लॅटफॉर्मवर डॉक्टर स्ट्रेचरसह उपलब्ध होणार आहे. याशिवाय, आपत्कालीन परिस्थितीत रेल्वे प्रवाशांना मोफत प्रथमोपचार देण्याची सोय असणार आहे.
- चोवीस तास रुग्णवाहिका सेवा
रेल्वेस्थानकावर न्यू ईरा हॉस्पिटलतर्फे चोवीस तास रुग्णवाहिका उपलब्ध असणार आहे. येथे गंभीर रुग्णांची प्रकृती स्थिर केल्यानंतर तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये भरती केले जाईल. सेवा आणि सुविधेची गुणवत्ता मुख्य वैद्यकीय अधीक्षक, विभागीय रेल्वे रुग्णालय, नागपूर आणि त्यांच्या टीमद्वारे सुनिश्चित केली जाईल.
- आपत्कालीन वैद्यकीय सेवेमुळे प्रवाशांचा वाचेल जीव - विजय दर्डा
लोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन व राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा हे शुभेच्छा देताना म्हणाले, मध्यवर्ती रेल्वेस्थानकावरून रोज हजारो प्रवासी प्रवास करतात. स्थानकावरच आता गंभीर रुग्णांना तातडीने आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्याने त्यांचा जीव वाचविण्यात मदत होईल. या उपक्रमासाठी पुढाकार घेणाऱ्या रेल्वे मंत्रालय, विभागीय रेल्वे व्यवस्थापक व न्यू ईरा हॉस्पिटलचे अभिनंदन. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक ऋचा खरे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार व महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनीही शुभेच्छा दिल्या.