पहिल्यांदाच महिलांच्या निवासाची सोय असलेले विश्रामगृह, मेडिकलमध्ये लोकार्पण
By सुमेध वाघमार | Published: April 25, 2024 08:36 PM2024-04-25T20:36:48+5:302024-04-25T20:36:58+5:30
प्रसूती वॉर्डासमोरील वऱ्हांडा झाला मोकळा
नागपूर: विदर्भच नव्हे तर मध्य भारतात पहिल्यांदाच शासकीय रुग्णालयामध्ये महिलांच्या निवासाची सोय असलेले ४४ बेडचे विश्रामगृहाचे लोकार्पण बुधवारी मेडिकलमध्ये झाले. या सोयीमुळे रुग्णांच्या नातेवाइकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषत: नातेवाईकांची नेहमी गर्दी असलेला प्रसूती वॉर्डासमोरील वºहांडा मोकळा झाला आहे.
मेडिकल कॉलेज कन्झूमर कोआॅपरेटिव्ह सोसायटीच्यावतीने चालविण्यात येणारे या विश्रामगृहाचे लोकार्पण उच्च न्यायालयाने नेमलेल्या तीन सदस्यीय चौकशी समितीच्या सदस्यांच्या हस्ते झाली. यावेळी समितीचे डॉ. रवींद्र सरनाईक, डॉ. अंजली कोल्हे व डॉ. निखिल बालंके यांच्यासह मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, उपअधिष्ठाता डॉ. देवेंद्र माहोरे, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. पाचपोर आदी उपस्थित होते. समितीच्या सदस्यांनी या विश्रामगृहाचे कौतुकही केले.
मेडिकलमध्ये रुग्णांच्या नातेवाइकांसाजी प्रतिक्षालय आहेत. परंतु तिथे झोपण्याची सोय नव्हती. याची दखल घेत अधिष्ठात डॉ. राज गजभिये यांनी पुरुषांसाठी स्वतंत्र ४८ बेडचे तर महिलांसाठी ४४ बेडचे विश्रामगृह बांधले. येथे आरामदायी निवासाच्या सोयींपासून ते आंघोळीसाठी लागणारे गरम पाणी, पिण्याचे थंड पाणी, कुलरची सोय, स्वच्छतागृहापासून ते कपडे वाळू टाकण्यासाठीची सोय उपलब्ध करून दिली. -उच्च न्यायालयाच्या समितीने केली पाहणी
मध्य भारतातील गरजू नागरिकांचा आधारस्तंभ असलेल्या मेयो व मेडिकल रुग्णालयामधील ओटी, आयसीयू, स्वयंपाकगृह, इमारती, अंतर्गत रस्ते इत्यादी सुविधांची दुरवस्था झाली असल्याची बाब लक्षात घेता उच्च न्यायालयाने नेमलेल्या तीन सदस्यीय समितीने या लोकार्पण कार्यक्रमानंतर मेडिकलची पाहणी केली. या पाहणी दरम्यान त्यांनी काही फोटो काढले. मेडिकलमध्ये सुरू असलेल्या विकास कामाची माहितीही घेतली. ही समिती २९ एप्रिलपर्यंत आपला अहवाल सादर करणार आहे.