जिल्हा परिषदेत आवक-जावक टपाल ऑनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:09 AM2021-01-02T04:09:26+5:302021-01-02T04:09:26+5:30
नागपूर : जिल्हा परिषदेने बहुतांश काम ऑनलाईन सुरू केले आहे. पण मॅन्युअली हाताळली जाणारी आवक-जावक टपालही आता ऑनलाईन ...
नागपूर : जिल्हा परिषदेने बहुतांश काम ऑनलाईन सुरू केले आहे. पण मॅन्युअली हाताळली जाणारी आवक-जावक टपालही आता ऑनलाईन करण्याचा जि.प. सीईओंचा मानस आहे. त्यासंदर्भात अधिकाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात येत आहे. लवकरच जिल्हा परिषदेत आवक-जावक टपाल ऑनलाईन होणार आहे.
जिल्हा परिषद मुख्यालयातील आवक-जावक विभागामध्ये प्रशासकीय कामांसह जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारीसंदर्भात टपाल प्राप्त होते. प्राप्त अर्ज, तक्रारी आणि निवेदनांच्या नोंदी आवक-जावक रजिस्टरमध्ये घेण्यात येतात. अनेकदा यातील काही तक्रारी, अर्ज हे गाहाळही होतात. त्यामुळे अभ्यागताना अथवा अर्जकर्त्याला त्याचे काम मार्गी लागण्यासाठी पुन्हा अर्ज, तक्रार करावी लागते. परंतु आता मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) योगेश कुंभेजकर यांच्या संकल्पनेतून जि.प.तील आवक-जावक विभागामध्ये प्राप्त होणाऱ्या टपालच्या नोंदी ऑनलाईन करण्यात येणार आहे. त्यासाठी आवक-जावक सॉफ्टवेअर प्रणाली सर्व कर्मचाऱ्यांसाठी लवकरच आवश्यक करण्यात येणार आहे. आवक-जावक सॉफ्टवेअर प्रणालीच्या माध्यमातून जि.प.ला प्राप्त होणारी टपाल ऑनलाईन पद्धतीने संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने कर्मचाऱ्यांकडे पाठविण्यात आलेल्या टपालपैकी किती निकाली काढण्यात आल्या आणि किती प्रलंबित आहे, यासंबंधीची सर्व माहिती सीईओंना तातडीने मिळणार आहे. या माध्यमातून प्रशासकीय कामांसह नागरिकांच्या तक्रारी निकाली काढण्याच्या कामावर नियंत्रण ठेवता येणार आहे. या अभिनव उपक्रमाद्वारे प्रलंबित प्रशासकीय कामांसह नागरिकांच्या तक्रारी निकाली काढण्याच्या कामाला गती मिळणार असून, झिरो पेंडेंन्सीचा उद्देश या माध्यातून सफल होणार असल्याचे सांगण्यात येते.
त्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर, वित्त लेखा अधिकारी प्रिया तेलकुंटे व आदी विभाग प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये विविध विभागातील कर्मचाऱ्यांना आवक-जावक टपाल सॉफ्टवेअर प्रणाली हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती आहे.