लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परतीच्या पावसाने चांगलीच दाणादाण उडवली आहे. याचा प्रभाव डासांचा प्रादूर्भावावरही झाला आहे. विशेषत: उपराजधानीवर डेंग्यूच्या विळखा अधिक घट्ट होऊ लागला आहे. मनपा आरोग्य विभाग आतापर्यंत डेंग्यूचे ४०० रुग्ण व एका मृत्यूची नोंद झाल्याचे सांगत असलेतरी प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे. बहुसंख्य रुग्णालयाच्या खाटा डेंग्यू रुग्णांनी व्यापलेल्या आहेत. या शिवाय, डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. यावर शुक्रवारी आरोग्य समितीने बैठक घेऊन आढावा घेतला.डेंग्यूच्या वाढत्या प्रकोपाला घेऊन आरोग्य समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी बैठकीत उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांना जिथे पाणी साचलेले आहे त्यावर औषध फवारणी करण्याचे निर्देश दिले. सोबतच ज्या पाण्यामध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत, त्यांना नोटीस देण्याचे आणि दंडात्मक कारवाई करण्याचा सूचनाही दिल्या आहेत. वॉटसअॅप व सोशल मिडीयाच्या मदतीने डेंग्यूच्या प्रति लोकांमध्ये जनजागृती करणारे मॅसेज देण्याचेही त्यांनी सूचविले.मनपाच्या आरोग्य उपसंचालक डॉ. भावना सोनकुसळे यांनी बैठकीत सांगितले, जिथे डेंग्यूसदृश रुग्ण आढळून येत आहे तिथे औषध फवारणी केली जात आहे. घरातील अन्य सदस्यांचीही तपासणी केली जात आहे. लोकांना जागरूक करण्याचे कार्यही केले जात आहे. रिकाम्या प्लॉटवर पाणी जमा होणार नाही या संदर्भातील दिशा-निर्देशही देण्यात आले आहे. खासगी इस्पितळांना डेंग्यू व डेंग्यू सदृश्य रुग्णांची माहिती देणे अनिवार्य केल्याचेही त्यांनी सांगितले.ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक रुग्णसप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात डेंग्यू सदृश्य आजाराचे ९४२ रुग्ण आढळून आले. यात ३३० डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे. सप्टेंबर महिन्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर नोव्हेंबर महिन्यात १९४ डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यात १०९८ डेंग्यू संशयीत रुग्णांची नोंद झाली असून यात डेंग्यूचे ३९५ रुग्ण आहेत.घराघरांची तपासणी व जनजागृतीमहानगरपालिकेच्या मलेरिया व फायलेरिया रोग विभागाकडून घराघरांची तपासणी केली जात आहे. यात डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून येणाऱ्यांना नोटीस दिली जात आहे. पाहणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कुलरच्या टाक्यापासून ते पाण्याचे ड्रम, फुलदाणी, कुंड्या, नाराळाच्या रिकाम्या कवट्या, टायर आदीमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून येत आहेत. कर्मचारी हे पाणी फेकून किंवा त्यामध्ये औषध फवारणी करून उपाययोजना करीत आहेत. या सोबतच डेंग्यू बाबत जनजागृती करून सात दिवसांवर पाणी जमा होणार नाही याची माहिती देत आहे. काही भागातील विहिरी व टाक्यात गप्पी मासेही सोडले जात आहे