भाषा टिकतील तरच भारताचे अस्तित्व राहील : सरसंघचालक मोहन भागवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 10:38 PM2019-07-20T22:38:12+5:302019-07-20T22:39:58+5:30
जगातील सर्वाधिक पुरातन देश म्हणून भारताची ओळख आहे. हा देशाचा पुरातन इतिहास, येथील संस्कृती, परंपरा वहन करण्याचे काम संस्कृत भाषेमुळे झाले आहे. देशात अनेक भाषा बोलल्या जातात आणि संस्कृत ही या सर्व भाषांना जोडणारी कडी होय. म्हणून भारताचा प्राचीन इतिहास टिकवायचा असेल तर संस्कृत आणि इतर भाषांचेही जतन, संवर्धन करणे आवश्यक आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगातील सर्वाधिक पुरातन देश म्हणून भारताची ओळख आहे. हा देशाचा पुरातन इतिहास, येथील संस्कृती, परंपरा वहन करण्याचे काम संस्कृत भाषेमुळे झाले आहे. देशात अनेक भाषा बोलल्या जातात आणि संस्कृत ही या सर्व भाषांना जोडणारी कडी होय. म्हणून भारताचा प्राचीन इतिहास टिकवायचा असेल तर संस्कृत आणि इतर भाषांचेही जतन, संवर्धन करणे आवश्यक आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.
कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ आणि संस्कृत संवर्धन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिष्ठानचे सचिव चमू कृष्णशास्त्री यांनी लिहिलेल्या ‘संस्कृतकक्ष्या’ या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ चिटणवीस सेंटर येथील सभागृहात शनिवारी पार पडला. यावेळी सरसंघचालक बोलत होते. याप्रसंगी संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. भागवत पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संस्कृत शिकू न दिल्याचे दु:ख होते कारण या देशाचा इतिहास समजायचा असेल तर संस्कृत जाणणे आवश्यक आहे, ही बाब त्यांना माहीत होती. संस्कृत ही सामान्यांची भाषा होती आणि म्हणूनच त्यातून मोठ्या प्रमाणात ग्रंथसंपदा, कथासार, वेद, उपनिषदे निर्माण झाले. मात्र एका काळात काही विशिष्ट वर्गासाठी ती मर्यादित करण्यात आली व इतर वर्गासाठी तिचे द्वार बंद करण्यात आले. तेव्हापासूनच संस्कृतच्या पतनाची सुरुवात झाल्याचे मत त्यांनी मांडले. पुढे इंग्रजांनी स्वत:च्या स्वार्थासाठी दूषित केल्याचे त्यांनी सांगितले.
संस्कृत केवळ व्यवहाराची व पुरातन ग्रंथाचीच भाषा नव्हती तर ज्ञानभाषाही होती. आयुर्वेद, योगविज्ञान, खगोलशास्त्र, लॉ, मॅनेजमेंट, विज्ञानाचे ज्ञान याच भाषेतून प्रवाहित झाले आहे. संगणकाच्या दृष्टीने तर ही अत्यंत महत्त्वाची भाषा आहे. त्यामुळेच जगातील विविध विद्यापीठामध्ये आज संस्कृत विषय शिकविला जात असून पाश्चात्त्य देश, तेथील शास्त्रज्ञ या भाषेचा अभ्यास करीत आहेत. कदाचित नेहमीच्या सवयीनुसार २० वर्षानंतर आपणही त्यांचे अनुकरण करू. मात्र संस्कृतशी आपले नाते स्वार्थी नाही कारण तिच्याबद्दल ममत्वाचा भाव आहे. ही भाषा संवर्धनासाठी व व्यवहारात आणण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. या भाषेबद्दल मुलांच्या मनातून भीती दूर होउन तिच्याविषयी आकर्षण व आपलेपणा निर्माण व्हावा आणि तसे वातावरण तयार व्हावे, अशी भावना डॉ. भागवत यांनी व्यक्त केली.
पुस्तकाचे लेखक चमू कृष्णशास्त्री प्रास्ताविकातून म्हणाले, भगवद्गीता, नाट्यशास्त्र, वेदवेदांत, भरतनाट्यम अशा प्रत्येक गोष्टींचा अभ्यास करताना संस्कृत आवश्यक आहे. शैक्षणिक क्षेत्रात संस्कृतमध्ये परिवर्तन व्हायला सुरुवात झाली असून डिजिटल माध्यमांवरही ते उपलब्ध होत आहे. मात्र उत्तर प्रदेशसारख्या काही राज्यात अद्याप हिंदीच्या शिक्षकांद्वारेच संस्कृत शिकविले जाते. ही परिस्थिती बदलणे आवश्यक असून त्यासाठी प्रतिष्ठान प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. श्रीनिवास वरखेडी म्हणाले, शासनाने शालेय शिक्षणात संस्कृत विषय बंधनकारक केला तरी इंग्रजीप्रमाणे संस्कृत शिकण्याविषयी मुलांच्या व पालकांच्या मनात भाव उत्पन्न होणार नाही तोपर्यंत त्याला काही अर्थ राहणार नाही. कार्यक्रमाला रा.स्व. संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी, विदर्भ सहसंघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया, विश्राम जामदार आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते.