नागपूर : मध्य रेल्वेनेनागपूरहूनमुंबईसाठी गेल्या आठवड्यात दोन सुपरफास्ट वन-वे ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यात पुन्हा एका स्पेशल ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे. पहिली ट्रेन शनिवारी १५, दुसरी १८ ऑक्टोबरला सुरू झाली असून, तिसरी ट्रेन आता २७ ऑक्टोबरला धावणार आहे.
दिवाळीमुळे प्रवाशांची रेल्वेगाड्यांमध्ये प्रचंड गर्दी वाढली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वन-वे स्पेशल (ट्रेन नंबर ०१०७६) विशेष शुल्कावर १५ ऑक्टोबरपासून सुरू केली आहे. दुसरी ट्रेन नंबर ०१०७८ ही नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई वन-वे स्पेशल रेल्वेगाडी १८ ऑक्टोबरला सुरू झाली, तर आता नव्या घोषणेनुसार तिसरी स्पेशल ट्रेन ०१०८० सुपरफास्ट स्पेशल २७ ऑक्टोबरला दुपारी दीड वाजता नागपूर स्थानकावरून निघणार आहे. ती दुसऱ्या दिवशी पहाटे ४.१० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल.
प्रवासादरम्यान या तीनही सुपरफास्ट वर्धा, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, आणि दादर या स्थानकावर थांबून प्रवाशांची ने-आण करेल. पहिल्या दोन रेल्वे गाड्यांमध्ये दोन एसी २ टियर, ८ एसी ३ टियर, ४ शयनयान श्रेणी, ५ सामान्य द्वितीय श्रेणी कोच असतील. यात एका गार्ड व्हॅन आणि जनरेटर व्हॅनचा समावेश आहे. तर तिसऱ्या गाडीत १५ शयनयान श्रेणी, दोन सामान्य द्वितीय श्रेणी आणि गार्ड ब्रेक व्हॅन राहणार आहे.
तिकडच्या प्रवाशांचे काय ?
मध्य रेल्वेने नागपूरहून सात दिवसांत तीन स्पेशल वन-वे ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला. मात्र, मुंबईहून नागपूरकडे एकही विशेष गाडी चालविण्याबाबत निर्णय घेतला नाही. त्यामुळे तिकडून येणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली आहे. परिणामी प्रवाशांची तीव्र गैरसोय होत आहे. रेल्वे प्रशासनाने ही बाब लक्षात घेऊन मुंबईहून नागपूरकरिता स्पेशल वन-वे ट्रेन सुरू कराव्या, अशी प्रवाशांमधून मागणी होत आहे.