लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात पेट्रोल आणि डिझेलमधील दरवाढीच्या पाठोपाठ आता घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीमध्येही ५० रुपयांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे आधीच वैतागलेल्या सर्वसामान्यांचे बजेट पार कोलमडून जाणार असून, महिला वर्गामध्ये यावर प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. एकापाठोपाठ होत चाललेल्या या दरवाढीचा फटका गरीब आणि सर्वसामान्य जनतेला बसत आहे.
कोरोना संकटाच्या काळात लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेक व्यवसाय थंडावले आणि ठप्पही पडले. यामुळे अनलॉकच्या प्रक्रियेमध्ये या परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी नव्या वर्षात पेट्रोल, डिझेलचे दर कमी होतील, असा अनेकांचा अंदाज होता. मात्र तो फोल ठरला. पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये ८ फेब्रुवारीपासून रोज वाढच होत आहे. यामुळे वाहनधारक त्रस्त झाले असतानाच आता घरगुती वापराचा गॅसही महागला आहे. यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. मात्र सरकारला जाची जाणीव असल्याच्या प्रतिक्रिया आता व्यक्त होत आहेत.
नव्या वर्षातील जानेवारी महिन्यातच गॅस कंपन्यांनी १ जानेवारी आणि १५ जानेवारीला क्रमश: ५० रुपयाची दरवाढ केली होती. यानंतर १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर झाला. या दिवसात गॅसचे दर वाढविले नाही. मात्र ४ फेब्रुवारीला पुन्हा २५ रुपयाची दरवाढ करण्यात आली. यामुळे गॅस सिलिंडरची किंमत ७७१ रुपयावर पोहचली. सोमवारी पुन्हा यात ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. ५० रुपयाच्या या दरवाढीमुळे नागपूर शहरात १४ किलोचे सिलिंडर ८२१ रुपयावर पोहचले आहे. आश्चर्याची बाब अशी की, सिलिंडरचे दर वाढूनही यावर दिली जाणारी सबसिडी मात्र पूर्वीसारखीच कमी आहे. यामुळे सर्वसामान्यांचे घरगुती बजेट कोलमडणार, हे नक्की.
पेट्रोल ९५.९५ तर डिझेल ८६.८८ रुपयावर
घरगुती गॅससोबतच पेट्रोल आणि डिझेलचे दरही वरचेवर वाढत आहेत. २६ जानेवारीला पेट्रोलचा दर प्रति लिटर ९३.१० रुपये तर डिझेलचा भाव ८३.५६ होता. यात ४ फेब्रुवारीपासून वाढच होत आहे. या दिवशी पेट्रोल ९३.६८ रुपये तर डिझेल ८४.२० रुपये दराने विकले गेले. सोमवारी पेट्रोल ९५.९५ रुपये आणि डिझेल ८६.८८ रुपये प्रति लिटर भावाने विकले गेले. या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक आणि वाहतूकदारांसमोर समस्या निर्माण झाली आहे. सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर कमी करून दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
असे वाढले पेट्रोल-डिझेलचे दर
तारीख - पेट्रोल - डिझेल
८ फेब्रुवारी - ९३.९८ - ८४.५३
९ फेब्रुवारी - ९४.३२ - ८४.९०
१० फेब्रुवारी - ९४.६१ - ८५.१६
११ फेब्रुवारी - ९४.८५ -८५.४८
१२ फेब्रुवारी - ९५.१५ - ८५.८५
१३ फेब्रुवारी - ९५.४२ - ८६.२४
१४ फेब्रुवारी - ९५.६९ - ८६.६३
१५ फेब्रुवारी - ९५.९५ - ८६.८८
(दर प्रति लिटर रुपयात आहेत.)