नागपूरसह राज्यात सहा ठिकाणी ‘इनोव्हेशन हब’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2022 08:15 PM2022-12-02T20:15:28+5:302022-12-02T20:16:20+5:30
Nagpur News राज्य कौशल्य विद्यापीठाच्यावतीने नागपुरात हेल्थकेअर, सप्लाय चेन आणि लॉजिस्टिक याचे इनोव्हेशन हब तयार करण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.
नागपूर : राज्य कौशल्य विद्यापीठाच्यावतीने नागपुरात हेल्थकेअर, सप्लाय चेन आणि लॉजिस्टिक याचे इनोव्हेशन हब तयार करण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली. नागपूरसह राज्यात सहा ठिकाणी असे इनोव्हेशन हब तयार केले जातील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी सांगितले की, कौशल्य विद्यापीठ हे मुंबईत आहे. यासोबतच नागपूर, अमरावती, पुणे, नाशिक, कोल्हापूर आदींसह १३ ठिकाणी उपकेंद्र सुरू करण्यात येत आहे. नागपुरातील विभागीय उपकेंद्र हे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात राहणार असून येत्या जुलै-ऑगस्टपासून त्याला सुरुवात होईल. केंद्रात पहिल्या टप्प्यात आयओटी सायबर सिक्युरिटी अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहे. या सर्व अभ्यासक्रमांना अभियांत्रिकीचा दर्जा (बी.टेक. व एम.टेक) राहील. उद्योगांच्या मागणीनुसार रोजगारक्षम शिक्षण देऊन आवश्यक मनुष्यबळ निर्मितीसाठी कौशल्य विद्यापीठाने कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग सायबर सिक्युरिटी, बिझनेस इंटेलिजन्स, इनोव्हेशन रोबोटिक्स अभ्यासक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे. यासोबतच मीडिया कम्युनिकेशन, ह्यूमॅनिटी आदी अभ्यासक्रमात सुरू केले जातील. चाळीस टक्के अभ्यास वर्ग आणि साठ टक्के ऑन द जॉब ट्रेनिंग देण्यात येईल.
यावेळी सहसंचालक पुरुषोत्तम देवतळे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अनंत सोनकुवर उपसंचालक मोटघरे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपप्राचार्य प्रमोद ठाकरे, उपप्रचार्य चांदेकर, पंडिले उपस्थित हाेते.
- राज्यात २०० कौशल्य सेंटर उभारणार
कौशल्य विद्यापीठाचे विविध सेंटर उभारण्यात येणार आहे. राज्यात जवळपास २०० कौशल्य सेंटर उभारण्यात येतील. जास्तीत जा स्त महाविद्यालयांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे डॉ. पालकर आवाहनही त्यांनी यावेळी केले.
-उद्योजकांशी चर्चा करून अभ्यासक्रम
कौशल्य विद्यापीठाचे उपकेंद्र तयार करताना उद्योजकांशी चर्चा केली जाणार आहे. त्यांना आवश्यक असलेले मनुष्यबळ व तंत्रज्ञान यातून अभ्यासक्रम निर्माण केले जाते. यात विविध अभ्यासक्रम असणार असून, यामुळे सदर अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगार व शिक्षणाची सोय असणार असल्याचे डॉ. पालकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.