कोरोना काळातही विनातिकीट प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:06 AM2021-06-04T04:06:44+5:302021-06-04T04:06:44+5:30
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये तसेच संक्रमणाची साखळी तुटावी म्हणून रेल्वेस्थानकावर खबरदारी घेण्यात येत आहे. सुरक्षाव्यवस्था तैनात असून ...
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये तसेच संक्रमणाची साखळी तुटावी म्हणून रेल्वेस्थानकावर खबरदारी घेण्यात येत आहे. सुरक्षाव्यवस्था तैनात असून प्रवाशांची तपासणी करूनच त्यांना आत प्रवेश दिला जात आहे. मात्र, सुरक्षाव्यवस्थेला भेदून विनातिकीट प्रवासी रेल्वेत शिरत आहेत. वर्षभरात नागपूर विभागात ४७ हजारांहून अधिक प्रवाशांची धरपकड करण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कठोर निर्बंध लावण्यात आले. याच पृष्ठभूमीवर गतवर्षी मार्च महिन्यापासून रेल्वेगाड्या बंद ठेवण्यात आल्या. दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा रुग्णांची संख्या वाढल्यामुळे प्रवासी घटले आहेत. पहिली लाट ओसरल्यावर विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात आल्या. या काळात केवळ आरएसी किंवा कन्फर्म तिकीट असणाऱ्यांनाच प्रवेश दिला गेला. सुरक्षाव्यवस्था मजबूत ठेवण्यात आली. ेएवढी काळजी घेऊनही विनातिकीट प्रवाशांनी प्रवेश केला.
१ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या काळात नागपूर विभागात ४७ हजार २५८ विनातिकीट प्रवाशांची धरपकड करण्यात आली. नियमानुसार त्यांच्याकडून दंडाची आकारणी करून पुढील प्रवासाची परवानगी दिली जाऊ शकते. पण, कोरोना काळात कन्फर्म तिकीट नसल्यास प्रवासाची परवानगी नसल्याने विनातिकीट प्रवाशांना बाहेर घालविणे अपेक्षित होते. पण, रेल्वेने त्यांच्याकडून तब्बल २ कोटी ९४ लाखांचा दंड वसूल करून अपेक्षित ठिकाणी प्रवासाची परवानगी दिली.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे सहायक वाणिज्य व्यवस्थापक व जनसंपर्क अधिकारी एस. जी. राव यांनी नागपूर विभागात प्रत्येक प्रवाशाची तपासणी केली जात असून आरएसी किंवा कन्फर्म तिकीट असणाऱ्यांनाच प्रवासाची संधी दिली जात असल्याचे सांगितले.
............