नागपूर मनपाचे हिवताप निरीक्षक बडतर्फ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 10:49 AM2020-02-18T10:49:05+5:302020-02-18T10:49:26+5:30
सतत कामावर गैरहजर राहणे व वरिष्ठांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सोमवारी नागपूर महापालिकेतील हिवताप निरीक्षक संजय रमेश चमके यांना सेवेतून बडतर्फ केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका प्रशासनाला शिस्त लावण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कामचुकार व दोषी अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचा धडाका लावला आहे. सतत कामावर गैरहजर राहणे व वरिष्ठांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सोमवारी महापालिकेतील हिवताप निरीक्षक संजय रमेश चमके यांना सेवेतून बडतर्फ केले.
चमके हे आॅक्टोबर २००९ ते एप्रिल २०१८ या कालावधीत ९४६ दिवस गैरहजर असल्याने व दोषारोप सिद्ध झाल्याने त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला. महाराष्ट्र मनपा अधिनियमाचे कलम ५२ (२) (ह) अन्वये त्यांना बडतर्फ करण्याचे आदेश काढले.
विशेष म्हणजे गेल्या शुक्रवारी मुंढे यांनी लक्ष्मीनगर झोनचे निलंबित कर संग्राहक आनंद लक्ष्मणराव फुलझेले यांना ९३ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी त्यांना मनपा सेवेतून बडतर्फ केले.
फुलझेले यांनी त्यांच्या सेवा काळात ९३ लाख कर स्वरूपात वसूल केले. परंतु महापालिकेच्या खात्यात ही रक्कम जमा केली नव्हती. तुकाराम मुंढे यांनी तीन दिवसात दोन अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केल्याने त्यांना सेवानिवृत्तीनंतरचे कोणतेही लाभ मिळणार नाहीत. या निर्णयामुळे महापालिकेतील अधिकारी व कर्मचाºयांत खळबळ उडाली आहे.