नागपुरातील अंधांचे प्रेरणास्रोत राधाताई बोरडे हरपल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:20 AM2018-02-09T00:20:53+5:302018-02-09T00:22:08+5:30
अंध मुलींसाठी निवासी वसतिगृह स्थापन करून त्यांना स्वावलंबी करणाऱ्या अंधांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ४५०० हून अधिक पुस्तकांचे ग्रंथालय उभारणाऱ्या, अंध असूनही समाजातील लोकांसाठी डोळसपणे काम करणाऱ्या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त राधाताई बोरडे यांचे गुरुवारी अपघातात दुर्दैवी निधन झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंध मुलींसाठी निवासी वसतिगृह स्थापन करून त्यांना स्वावलंबी करणाऱ्या अंधांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ४५०० हून अधिक पुस्तकांचे ग्रंथालय उभारणाऱ्या, अंध असूनही समाजातील लोकांसाठी डोळसपणे काम करणाऱ्या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त राधाताई बोरडे यांचे गुरुवारी अपघातात दुर्दैवी निधन झाले.
गुरुवारी सायंकाळच्या सुमारास राधाताई भाचीच्या दुचाकीवर मानेवाडा रोडवरून जात असताना, गाडी अचानक पंक्चर झाली. गाडीचा तोल गेल्याने त्या खाली पडल्या. त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार बसला. मेडिकलमध्ये त्यांना उपचारासाठी नेले असता, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
लहानपणीच आजारात दृष्टी गमावूनही जिद्दीने सर्व कठीण परिस्थितीवर मात करत अंधांच्याच नव्हे तर डोळसांसमोरही स्वकायार्तून राधाताई बोरडे इखनकर यांनी आदर्श निर्माण केला. अंधांसाठी वाचनालयाच्या स्थापनेबरोबरच ‘उत्कर्ष असोसिशन फॉर ब्लार्इंड’ ही संस्था सुरू केली. त्याअंतर्गत अंध मुलींसाठी त्या ‘संस्कार’ निवासी वसतिगृह सुरू केले. याशिवाय जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त पांढऱ्या काठ्यांच्या वाटपाबरोबर, दिवाळीचा फराळ आणि प्रत्येकी १० किलो तांदळाचे वाटप करून गरिबांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने दिवाळी त्या साजरी करीत होत्या.
शिक्षणाची प्रचंड जिद्द असलेल्या राधाताई नागपूर विद्यापीठात एम.ए. ला द्वितीय आल्या होत्या. पुंडलिक बोरडे यांच्याशी विवाह झाला. तेही दृष्टिहीन आहेत. शिक्षक व्हायचे स्वप्न असलेल्या राधा यांनी बी.एड.ही केले आणि चार वर्षे लेक्चरर म्हणून काम केले. मात्र मुलगी मधुराच्या वेळी बाळंतपणाच्या गुंतागुंतीत त्यांना नोकरी सोडावी लागली.
‘अंध महिला विकास बहुउद्देशीय संस्थे’च्या माध्यमातून सामाजिक कार्यास सुरुवात केली होती. दृष्टी नसणे हे त्याच्या समाजकार्याच्या आड आले नाही. पुढे त्या संगीत विशारदही झाल्या. राधाताईने २००४ मध्ये ‘लुई-राम’ वाचनालय घरातच अपुऱ्या जागेत सुरू केले. त्यांचे काम पाहून एका सद्गृहस्थांनी ५०० रुपयांच्या मासिक भाड्यावर मोठी जागा वाचनालयासाठी दिली. आज या ग्रंथालयात २००० ब्रेल लिपीतील पुस्तकांसह ४५०० पुस्तके असून त्याचा लाभ सगळेच जण घेत आहेत. अंध मुलींना स्वयंपाक करता यावा यासाठी त्या राज्यभरात शिबिर घेत होत्या.