भारतीय इतिहास, संस्कृती, परंपरा प्रेरणादायी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 04:12 AM2020-11-28T04:12:53+5:302020-11-28T04:12:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - भौतिक विकास करून आम्ही एका बाजूला आमची अर्थव्यवस्था जागतिक स्तराची होईल, पण भारतीय इतिहास, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - भौतिक विकास करून आम्ही एका बाजूला आमची अर्थव्यवस्था जागतिक स्तराची होईल, पण भारतीय इतिहास, संस्कृती, परंपरा ही आमची मोठी संपत्ती आहे. त्याआधारेच आम्ही भविष्यातील पिढी निर्माण करतो. भारतीय साहित्य, संस्कृती, वा.डमय, परंपरा यापासून आम्हाला प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी केले. रायसोनी समूहातर्फे आयोजित ‘लिट्रेचर फेस्टिव्हल २०२०’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
भारतीय साहित्यासोबत जोडले गेलेले ज्ञानही महत्त्वपूर्ण आहे. आमचे संस्कारांचे यज्ञ भावी पिढीला संस्कारित करणारे आहेत. ज्ञानासोबत ते व्यक्तिमत्त्वही घडविणारे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत. आज राजकारणातील प्रत्येकाने छत्रपतींचे चरित्र वाचले पाहिजे, असे ते म्हणाले.
आजही इंडोनेशिया, कंबोडियात रामायण, महाभारतावर चर्चा होते. मूल्याधिष्ठित जीवनपध्दती ही आमची ताकद आहे. ज्ञान विज्ञान, संशोधन, तंत्रज्ञान मूल्याधिष्ठित जीवन पध्दती आणि परिवार पध्दतीचा समन्वय साधून आम्हाला पुढे जावे लागेल, असेही गडकरी यांनी सांगितले.
प्रबोधन, प्रशिक्षण आणि संशोधन विकास ही त्रिसूत्री महत्त्वाची आहे. या तीनही गोष्टींचा संबंध ज्या साहित्यासोबत, इतिहासासोबत, संस्कृतीसोबत येतो, त्या गोष्टी वर्तमान स्थितीत जर नवीन पिढीला समजावून सांगितल्या तर नवीन पिढी त्याचा निश्चित स्वीकार करेल. त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहन त्यांनी केले.