लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हेगारांच्या एका आंतरराज्यीय टोळीला अटक केली. त्यांच्याकडून पिस्तुल आणि काडतुसांसह घातक शस्त्रे जप्त केली. राहुल ऊर्फ राजेंद्र राजेश पालेवार (वय १९), मोहम्मद कलीम ऊर्फ सोनू अख्तर अली (वय २२), विनोदकुमार भोजलाल भिमटे (वय २०) आणि आमिर खान मेहबूब खान (वय १९, रा. बालाघाट) अशी अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार पळून गेला आहे.सोमवारी रात्री ही टोळी मोठ्या गुन्ह्याच्या इराद्याने गार्ड लाईन परिसरात फिरत असताना रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकाला ती माहिती कळाली. त्यावरून पोलिसांनी त्यांच्यावर झडप घालून उपरोक्त चौघांना पकडले. त्यांचा एक साथीदार मात्र पळून गेला. पकडण्यात आलेल्या गुन्हेगारांकडे पिस्तुल, काडतूस तसेच दरोड्यात वापरले जाणारे शस्त्र सापडले. ते जप्त करण्यात आले. आरोपींविरुद्ध गोंदिया, बालाघाट, बिलासपूर आदी ठिकाणी हत्येचा प्रयत्न, लुटमार, चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली. गुन्हे शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर, उपनिरीक्षक नितेश डोर्लीकर, एएसआय राजेंद्र बघेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.
नागपुरात गुन्हेगारांची आंतरराज्यीय टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 12:08 AM
गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हेगारांच्या एका आंतरराज्यीय टोळीला अटक केली. त्यांच्याकडून पिस्तुल आणि काडतुसांसह घातक शस्त्रे जप्त केली.
ठळक मुद्देपिस्तुल, काडतूस जप्त : गुन्हे शाखेची कामगिरी