आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिवस; मंगळ ग्रहाप्रमाणे तर हाेणार नाही अवस्था?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2022 08:00 AM2022-04-22T08:00:00+5:302022-04-21T21:04:06+5:30

Nagpur News जीववैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार, पृथ्वीवरील अनेक प्रजाती नष्ट हाेत आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षांत पृथ्वीची अवस्था मंगळाप्रमाणे हाेईल का, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

International Earth Day; earth will turn Like Mars? | आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिवस; मंगळ ग्रहाप्रमाणे तर हाेणार नाही अवस्था?

आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिवस; मंगळ ग्रहाप्रमाणे तर हाेणार नाही अवस्था?

Next
ठळक मुद्देजीवसृष्टी विलुप्त हाेण्याच्या सहाव्या घटनेचाही धाेका यावेळी मानवनिर्मित असेल संकट

 

निशांत वानखेडे

नागपूर : काही अब्ज वर्षांपूर्वी आपल्या साैरमालेतील लाल ग्रह म्हणजे मंगळावर जीवसृष्टी किंवा पाण्याचे स्राेत असण्याचा दावा खगाेल वैज्ञानिकांद्वारे केला जाताे. मात्र, सूर्याच्या मॅग्नेटिक शक्तीमुळे तापमान वाढून सर्व नष्ट झाले. सध्या आपली पृथ्वी याच अवस्थेतून जात आहे. जागतिक तापमान वाढीचे संकट दिवसेंदिवस भीषण रूप घेत असून जीववैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार, पृथ्वीवरील अनेक प्रजाती नष्ट हाेत आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षांत पृथ्वीची अवस्था मंगळाप्रमाणे हाेईल का, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

पृथ्वीवर आतापर्यंत पाचवेळा सामूहिकरीत्या जैवविविधता विलुप्त हाेण्याच्या घटना घडल्या आहेत. आईस एज किंवा डायनाेसार विलुप्त हाेण्याची घटना त्यामधलीच आहे. मात्र, या सगळ्या घटना नैसर्गिक आणि मानव जन्मापूर्वीच्या हाेत्या. जैवविविधतेवर संकटाची सहावी घटना मानवनिर्मित असेल, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. काही वैज्ञानिकांच्या मते, जैवविविधता विलुप्त हाेण्याच्या घटनेला सुरुवातही झाली आहे. यात अनेक पक्षी, प्राण्यांच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत. विकासकामे आणि वनसंपदा नष्ट हाेणे, हे संकटाचे माेठे कारण आहेत.

तापमान वाढीचा धाेका

नुकत्याच एका रिपाेर्टनुसार, २०५० पर्यंत २ नाही, तर ३ अंशाने वाढण्याची शक्यता आहे. यामुळे येत्या काही वर्षांत पृथ्वीवर प्रचंड उलथापालथ हाेण्याची शक्यता आहे. अनेक सजीव प्रजाती नष्ट हाेतील. यात असंख्य वनस्पती, सरपटणारे प्राणी व पक्ष्यांची संख्या अधिक आहे. अनियंत्रित विकास आणि जंगले नष्ट हाेत चालल्याने तापमान वाढ हाेत आहे. संशाेधकांच्या अभ्यासानुसार, मागील ४० वर्षांत जगातील अर्धे वन्यजीव नामशेष झाले आहेत. तापमान वाढ आणि प्रदूषणाचे संकट समुद्री जिवांवर अधिक वाढले आहे.

१५०० वर्षांत २.६० लाख प्रजाती नष्ट झाल्या

यूएच मानोआ पॅसिफिक बायोसायंसेज रिसर्च संस्थेच्या वैज्ञानिकांनी जमिनीत राहणारे घाेंगे यांच्या अध्ययनातून १५०० वर्षांचा इतिहास धुंडाळला आहे. त्यानुसार १५०० इसवीनंतर पृथ्वीवर ज्ञात असलेल्या २० लाख प्रजातींपैकी ७.५ ते १३ टक्के प्रजाती नामशेष झाल्या. म्हणजे जवळपास २ ला ६० हजार प्रजाती विलुप्त झाल्या. यात पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांची संख्या अधिक आहे. मात्र, मागील ४०० वर्षांत नष्ट झालेल्या केवळ ८०० प्रजातींचे डाक्युमेंटेशन हाेऊ शकले आहे. सध्याच्या परिस्थितीत दरराेज एक प्रजाती नष्ट हाेत असल्याची भीती वैज्ञानिकांना आहे.

काेराेनासारख्या महामारीचे संकट वाढेल

जंगल नष्ट झाली की प्राणी नष्ट हाेतील आणि त्याचा मानवावर प्रभाव पडणार आहे. तापमान वाढले की राेगराई वाढेल, पाऊस वाढला तर राेगराई वाढेल. प्राणी नष्ट झाले की त्यांचे आजार मानवापर्यंत पाेहोचतील. मागील दाेन वर्षांत जगभरात काेट्यवधी लाेक काेराेनाने दगावली आहेत. पुढे अशी महामारी वाढण्याची भीती वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.

वेगाने झाडे कापली जात आहेत, तेवढ्या वेगाने नवी झाडे हाेत नाहीत. नदी व भूगर्भातून जेवढे पाणी काढताे तेवढे पावसाने भरले जात नाही. आपण अतिशय वेगाने संकटाकडे ओढले जात आहाेत. हे संकट थांबविण्यासाठी जगाने एकत्र येऊन आपली जंगले, पर्यावरण वाचविण्याची नितांत गरज आहे, अन्यथा वैज्ञानिकांच्या निर्धारित वेळेच्या आधीच सामूहिक विलुप्तीची घटना घडेल.

- प्रा. सुरेश चाेपणे, हवामान अभ्यासक.

Web Title: International Earth Day; earth will turn Like Mars?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Earthपृथ्वी