वाहनचोरांच्या आंतरराज्यीय टोळीचा भांडाफोड; मेट्रो पार्किंगमधून चोरायचे दुचाकी
By योगेश पांडे | Published: March 26, 2024 10:44 PM2024-03-26T22:44:35+5:302024-03-26T22:45:44+5:30
आरोपी हे नागपूर शहरात मध्य प्रदेश येथून दुचाकी चालवत येत होते व रेकी करून मेट्रोची पार्किंग व सार्वजनिक वाहन पार्क असलेले ठिकाणे शोधायचे.
नागपूर : वाहनचोरांच्या आंतरराज्यीय टोळीचा नागपूरपोलिसांनी भंडाफोड केला आहे. ही टोळी मेट्रो पार्किंग तसेच सार्वजनिक ठिकाणी पार्क असलेल्या दुचाकी चोरी करायची. धंतोली पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
आरोपी हे नागपूर शहरात मध्य प्रदेश येथून दुचाकी चालवत येत होते व रेकी करून मेट्रोची पार्किंग व सार्वजनिक वाहन पार्क असलेले ठिकाणे शोधायचे. संबंधित पार्किंगचे ठिकाणी त्यांची दुचाकी पार्क करून त्या ठिकाणावरून डुप्लीकेट चाबीचा वापर करून ज्या गाडीला चावी लागेल ती गाडी चोरी करून ते परत त्यांच्या राज्यात जात होते. नागरिकांच्या दुचाकी चोरी बाबतच्या तक्रारी पोलीस स्टेशन धंतोली येथे प्राप्त झाल्याने दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदर चोरीच्या तपासात धंतोली पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार तांत्रिक तपासाच्या आधारे मध्यप्रदेशातील बालाघाट येथील अतुल शामलाल बी सेन, सौरभ दिलीप मासुरकर, सोनू उर्फ ऋषभ दिलीप मासुरकर यांना ताब्यात घेतले. त्यांनी चोऱ्यांची कबुली दिली. त्यांच्या चौकशीतून वाहन चोरीचे ८ गुन्हे उघडकीस आले. त्यांच्याकडून २० दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक कोळी, सहायक पोलीस निरीक्षक संकेत चौधरी, सुभाष वासाडे, बाळू जाधव, .विनोद चव्हाण, हरीश कामडी, माणिक दहिफळे, वृषभ निशितकर, विक्रम ठाकुर यांच्या पथकाने ही कारवाई केली. या पथकाचा पोलीस आयुक्तांनीदेखील सत्कार केला.