प्रिस्क्रिप्शनविना नशेच्या गोळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:09 AM2021-02-10T04:09:04+5:302021-02-10T04:09:04+5:30
विकणाऱ्या मेडिकल स्टोअरवर कारवाई () - कपिलनगर ठाण्यांतर्गत मीत फार्मसी : संचालकाला अटक नागपूर : प्रिस्क्रिप्शनविना नशेच्या गोळ्या विकणाऱ्या ...
विकणाऱ्या मेडिकल स्टोअरवर कारवाई ()
- कपिलनगर ठाण्यांतर्गत मीत फार्मसी : संचालकाला अटक
नागपूर : प्रिस्क्रिप्शनविना नशेच्या गोळ्या विकणाऱ्या मेडिकल स्टोअर्सवर अन्न व औषधी प्रशासन विभागाने (एफडीए) कारवाई केली. ही कारवाई कपिलनगर ठाण्यांतर्गत दीपसिंहनगर येथील मीत मेडिकल स्टोअरवर सोमवारी दुपारी ४ वाजता करण्यात आली. या प्रकरणी संचालकाला अटक करण्यात आली आहे.
नियमानुसार मेडिकल स्टोअर्सला झोपेच्या गोळ्या डॉक्टरांच्या चिठ्ठीविना विकता येत नाहीत. एफडीएचे प्रभारी सहायक आयुक्त (औषधी) डॉ. पुष्पहास बल्लाळ यांना मीत मेडिकल स्टोअर्समध्ये झोपेच्या गोळ्यांची विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर डॉ. बल्लाळ यांच्या चमूने पोलिसांच्या मदतीने मीत मेडिकल स्टोअर्समध्ये एका डमी ग्राहकाला झोपेच्या गोळ्या खरेदीसाठी पाठविले. स्टोअर्समधून ग्राहकाला गोळ्या मिळाल्याचे संकेत मिळतात चमूने धाड टाकली. एफडीए चमूने मेडिकल स्टोर्समधून नायट्राजेपॉम या झोपेच्या गोळ्यांसह बिलाविना अन्य नशेच्या औषधांचा जुना एक्सपायरी स्टॉक जप्त केला.
चौकशीदरम्यान मेडिकल स्टोअर्सचे संचालक बिलाविना झोपेच्या गोळ्यांची खरेदी कुठून केली, याची माहिती देऊ शकले नाहीत. त्यानंतर कपिलनगर ठाण्यात स्टोअर्सच्या संचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. संचालक अमित सेठी यांना रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली.
गोळ्यांचा नशेसाठी उपयोग
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक युवक झोपेच्या गोळ्यांचा उपयोग नशेसाठी करतात. प्रिस्क्रिप्शनविना अनेक मेडिकल स्टोअर्समध्ये या गोळ्यांची विक्री करण्यात येत आहे. गेल्या तीन महिन्यांत एफडीएने पेंशननगर येथील आकाश मेडिकल, गोरेवाडा रोडवरील एसआर फार्मा, त्रिमूर्तीनगर येथील सतीश मेडिकल स्टोअर्सवर कारवाई केली होती. गेल्या आठवड्यात गर्भपाताकरिता उपयोगात येणारी एमटीपी किटची विक्री खोट्या नावाने करणाऱ्या कॉटन मार्केट रोडवरील प्रकाश मेडिकलवरही कारवाई केली होती.