मेडिट्रीनामधील गैरव्यवहाराचीही चौकशी : समीर पालतेवार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:30 PM2019-01-30T23:30:11+5:302019-01-30T23:33:33+5:30

शासकीय योजनांच्या नावावर रुग्ण आणि प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे शाखा मेडिट्रीना रुग्णालयाच्या भूमिकेचाही तपास करणार आहे. यासाठी शासकीय योजना लागू करणाऱ्या सर्व विभागांशी पोलीस संपर्क साधून तक्रारकर्त्यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे. याच्या आधारावरच मेडिट्रीना हॉस्पिटलचे सीएमडी डॉ. समीर पालतेवार आणि त्यांच्या साथीदारांची विचारपूस करण्यात येईल. दरम्यान, अटक टाळण्यासाठी न्यायालयातून कुठलाही दिलासा न मिळाल्याने डॉ. पालतेवार यांची उलटगिनती सुरू झाली आहे. त्यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Investigation of fraud in Meditrina:Sameer Paltekar's anticipatory bail plea rejected | मेडिट्रीनामधील गैरव्यवहाराचीही चौकशी : समीर पालतेवार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

मेडिट्रीनामधील गैरव्यवहाराचीही चौकशी : समीर पालतेवार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Next
ठळक मुद्देपोलीस साधणार सर्व विभागांशी संपर्क

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय योजनांच्या नावावर रुग्ण आणि प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे शाखा मेडिट्रीना रुग्णालयाच्या भूमिकेचाही तपास करणार आहे. यासाठी शासकीय योजना लागू करणाऱ्या सर्व विभागांशी पोलीस संपर्क साधून तक्रारकर्त्यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे. याच्या आधारावरच मेडिट्रीना हॉस्पिटलचे सीएमडी डॉ. समीर पालतेवार आणि त्यांच्या साथीदारांची विचारपूस करण्यात येईल. दरम्यान, अटक टाळण्यासाठी न्यायालयातून कुठलाही दिलासा न मिळाल्याने डॉ. पालतेवार यांची उलटगिनती सुरू झाली आहे. त्यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गुन्हे शाखा पोलिसांनी गेल्या २२ जानेवारी रोजी गणेश चक्करवार यांच्या तक्रारीच्या आधारावर डॉ. पालतेवार आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध चार कोटी रुपयांचा अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणात डॉ. पालतेवार यांची पत्नी सोनाली आणि हॉस्पिटल व्यवस्थापनाशी संबंधित डॉक्टरांच्या भूमिकेचा तपास करीत आहेत. डॉ. पालतेवार आणि त्यांच्या साथीदारांवर राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत गैरव्यवहार करणे, रुग्णांकडून पैसे वसूल करणे, रुग्णांच्या नावावर पैसे परस्पर वापरणे, बोगस व्हाऊचरद्वारा रुग्णालयाच्या खात्यातून पैसे काढणे आणि बोगस दस्तावेज बनवून फसवणूक करण्याचा आरोप आहे.
सूत्रानुसार शासकीय आरोग्य योजनेत अनेक विभाग मेडिट्रीना हॉस्पिटलशी संलग्न आहेत. उपचारासाठी जाणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांकडून वसुलीसाठी त्रास दिला जातो. त्यांना कुठल्याही उपचाराविना रुग्णालयात भरती ठेवले जात होते. गरीब वर्गातील लोकांसाठी गंभीर आजारावर नि:शुल्क उपचार उपलब्ध करून देण्यासाठी शासनातर्फे अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांकडून मेडिट्रीना रुग्णालयात वसुली केली जात होती. त्यांच्याकडून उपचार किंवा औषधीच्या नावावर अवैध पद्धतीने पैसे वसूल केले जात होते. विरोध केल्यास योग्य उपचार होणार नाही, अशी भीती दाखवून त्यांना मजबूर केले जायचे. अनेक लोकांनी आरोग्य विभागाकडे याची तक्रारही केली होती. परंतु आरोग्य विभागाने कुठलीही कार्यवाही केली नव्हती. पीडित लोकांनी स्थानिक प्रशासनाकडेही तक्रार केली होती, परंतु त्यांनीही कारवाई केली नाही. त्यामुळे पीडित शांत बसले.
ताजा प्रकरणानंतर ते पीडितही आता पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहेत. त्यामुळे पोलीस आता आरोग्य योजनांचे संचालन करणाऱ्या शासकीय विभागांविरुद्धच्या तक्रारींची माहिती जाणून घेणार आहे. या माहितीच्या आधारावर पीडित आणि आरोपींची विचारपूस केली जाणार आहे.
सत्र न्यायालय : अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
रामदासपेठेतील मेडिट्रिना हॉस्पिटलचे संचालक डॉ. समीर नारायण पालतेवार यांना बुधवारी जोरदार दणका बसला. सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायाधीश एस.ए.एस.एम. अली यांनी हा निर्णय दिला.
गणेश चक्करवार यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी पालतेवार व त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४०६, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२०-ब, ३४ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. मेडिट्रिना हॉस्पिटलचे संचालन तक्रारकर्ते गणेश चक्करवार, पालतेवार व इतरांद्वारे करण्यात येते. चक्करवार यांनी पालतेवार, विशाल मुत्तेमवार आदींच्या मदतीने २००६ मध्ये व्हीआरजी हेल्थ केअर सुरू केले होते. २०१२ मध्ये मुत्तेमवार व अन्य काही लोक वेगळे झाल्यानंतर मेडिट्रिना हॉस्पिटल सुरू करण्यात आले. पोलीस तक्रारीनुसार, पालतेवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये मोठा घोटाळा केला आहे. पालतेवार यांनी बनावट व्हाऊचरद्वारे हॉस्पिटलच्या खात्यातील मोठी रक्कम परस्पर काढून घेतली. या व्यवहाराचा कुठलाही हिशेब त्यांनी ठेवला नाही. पालतेवार यांच्यावर याशिवायही विविध आरोप आहेत. न्यायालयात पालतेवार यांच्यातर्फे वरिष्ठ वकील अविनाश गुप्ता तर, सरकारतर्फे अ‍ॅड. नितीन तेलगोटे यांनी कामकाज पाहिले.

 

Web Title: Investigation of fraud in Meditrina:Sameer Paltekar's anticipatory bail plea rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.