नागपूरच्या वस्त्यांमधील उद्योगांची होणार तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 11:31 PM2018-12-28T23:31:36+5:302018-12-28T23:32:50+5:30
पूर्व नागपुरातील अनेक दाट लोकवस्ती असलेल्या वस्त्यांमध्ये विविध उद्योग सुरू आहेत. यामुळे प्रदूषण पसरत आहे. परिसरातील नागरिकांना त्यामुळे त्रास होत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाटी महावितरण आणि एसएनडीएलची एक संयुक्त समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालाच्या आधारावर कारवाई केली जाईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पूर्व नागपुरातील अनेक दाट लोकवस्ती असलेल्या वस्त्यांमध्ये विविध उद्योग सुरू आहेत. यामुळे प्रदूषण पसरत आहे. परिसरातील नागरिकांना त्यामुळे त्रास होत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाटी महावितरण आणि एसएनडीएलची एक संयुक्त समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालाच्या आधारावर कारवाई केली जाईल.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शहरात जनसंवाद कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. २४ डिसेंबर रोजी सतरंजीपुरा झोनमध्ये आयोजित जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांनी तक्रार केली होती की, वस्त्यांमध्ये उद्योग स्थापित आहेत. एकट्या सतरंजीपुरा झोनमध्ये असे ३५ उद्योग आहेत जे अवैध आहेत. यामुळे लोकांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. याअंतर्गत महावितरणचे अधीक्षक अभियंता मनीष वाठ यांनी प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठित केली आहे. या समितीत चार सदस्य आहे. यात महावितरणचे कार्यकारी अभियंता राजेंद्र गिरी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता कुलदीपक भस्मे, एसएनडीएलचे राजेश तुरकर आणि गौरव गुप्ता यांचा समावेश आहे.
समितीला तीन दिवसात परिसराची तपासणी करून अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. या समितीला परिसरात कुठे-कुठे अवैध वीज कनेक्शन आहे. घरगुती वीज कनेक्शन घेऊन उद्योग चालविले जात आहे, याची तपासणी करायची आहे. अशा अवैध वीज कनेक्शनचा पुरवठा बंद करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.