उपराजधानीत आयपीएल सट्टा सुरूच : हिंगणघाट, वाशिमचे क्रिकेट बुकी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 09:02 PM2020-10-26T21:02:03+5:302020-10-26T21:03:41+5:30
IPL betting den raided, Crime news, nagpur शनिवारी रात्री गुन्हे शाखेच्या पथकाने अंबाझरी पोलीस ठाण्यात सुरू असलेल्या एका क्रिकेट सट्ट्याच्या अड्ड्यावर छापा घालून तीन बुकींना पकडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खुद्द पोलीस आयुक्तांनीच बड्या क्रिकेट बुकींना जोरदार दणका देऊनही अनेक क्रिकेट बुकींना त्याचा फारसा फरक पडला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
शनिवारी रात्री गुन्हे शाखेच्या पथकाने अंबाझरी पोलीस ठाण्यात सुरू असलेल्या एका क्रिकेट सट्ट्याच्या अड्ड्यावर छापा घालून तीन बुकींना पकडले. प्रतीक ऊर्फ मौसम राजकुमार रामचंदानी (वय २२, रा. शिवाजीनगर, हिंगणघाट), पंकज विष्णू आहुजा (वय २४, रा. साईनगर हिंगणघाट) आणि जीतू महेश कटारिया (वय २४, रा. सिंधी कॅम्प, वाशिम), अशी अटक केलेल्या बुकींची नावे असून, चौथा बुकी तुलसी पाखरानी फरार आहे.
या अड्ड्याचा मुख्य सूत्रधार प्रतीक ऊर्फ मौसम रामचंदानी असून, तो अनेक दिवसांपासून बुक चालवितो. दोन महिन्यापूर्वी त्याने शिवाजीनगरातील कांचन विमल अपार्टमेंटमध्ये सदनिका भाड्याने घेऊन क्रिकेट सट्ट्याचा अड्डा सुरू केला होता. शनिवारी दिल्ली-कोलकाता दरम्यान सुरू असलेल्या सामन्यावर ते सट्टेबाजी करीत होते. गुन्हे शाखेला त्याची कुणकूण लागताच पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर, सहायक निरीक्षक परतेकी, उपनिरीक्षक झाडोकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तेथे छापा मारला. यावेळी तेथे उपरोक्त बुकी सट्ट्याची खायवाडी करताना आढळले. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख ६८ हजार रुपये, टीव्ही, दोन दुचाकी, पाच मोबाईल असा एकूण अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त करून या तिघांविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
जरीपटका, खामल्यातून हूल
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मॅच फिक्सर संजय ऊर्फ छोटू अग्रवाल, जितू कामनानी, प्रशांत शहा, अभिषेक लुणावत, शंकर कक्कड, शैलेश लखोटिया आणि पंकज वाधवानी यांना १२ ऑक्टोबरला पकडले होते. त्यानंतर काही दिवस शहरातील क्रिकेट अड्डे बंद झाले. मात्र, हरचंदानी, अतुल चंद्रपूर, राणू यवतमाळ यांच्यासह जरीपटक्यातील कालू आणि खामल्यातील छत्तानीकडून बुकींना हूल देणे सुरू असल्याने क्रिकेट सट्टा पूर्ववत सुरू झाल्याची चर्चा आहे.