वाडी : राष्ट्रीय महामार्गालगत ठेवलेले लाेखंडी अँगल चाेरून नेणाऱ्या चाेरट्याला वाडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून २७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी सायंकाळी करण्यात आली.
सुरेश शर्मा लोंढे (२५, रा. रहाटेनगर टोली, बेलतरोडी, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव असून, ताे हल्ली नागलवाडी (ता. हिंगणा) येथे राहताे. नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील वडधामणा शिवारातील वळणावर असलेल्या डाेंगराळ भागात अटलांटा नामक कन्स्ट्रक्शन कंपनीने त्यांचे काही लाेखंडी साहित्य ठेवले आहे. त्यातील लाेखंडी अँगल चाेरीला गेल्याने कंपनीचे पर्यवेक्षक प्रसाद तल्हार यांनी वाडी पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदविली हाेती. त्याअनुषंगाने वाडी पाेलिसांनी भादंविचे कलम ३७९ अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला.
सुरेशने ही चाेरी केल्याची माहिती मिळताच पाेलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेत विचारपूस केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याला अटक करण्यात आली, शिवाय त्याने चाेरून नेलेले २५ हजार ५०० रुपये किमतीचे साहित्य जप्त केले. त्याच्याकडून चाेरीच्या अन्य घटना उघड हाेण्याची शक्यता पाेलिसांनी व्यक्त केली. या घटनेचा तपास पाेलीस हवालदार सुनील म्हस्के करीत आहेत.