नागपूर जिल्ह्यातील ४० पशुरुग्णालयांना ‘आयएसओ’चा मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 10:05 PM2018-05-17T22:05:43+5:302018-05-17T22:06:01+5:30
देशातील विविध क्षेत्रातील जीडीपीचा विचार केल्यास, इतर क्षेत्राच्या तुलनेत पशु आणि दुग्ध व्यवसायाचा जीडीपी वाढलेला दिसतो आहे. त्यामुळे पशु संवर्धनाला सरकारकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. पशु आणि दुग्ध व्यवसायात वाढलेल्या जीडीपीत महत्त्वाची भूमिका पशु वैद्यकीय रुग्णालयांची आहे. पशु संवर्धनाचे काम करणारी ही रुग्णालये आता डिजिटलायझेशनकडे वाटचाल करीत आहे. याचाच एक भाग म्हणून नागपूर जिल्ह्यातील ४० पशु रुग्णालयांना ‘आयएसओ’चा मान मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशातील विविध क्षेत्रातील जीडीपीचा विचार केल्यास, इतर क्षेत्राच्या तुलनेत पशु आणि दुग्ध व्यवसायाचा जीडीपी वाढलेला दिसतो आहे. त्यामुळे पशु संवर्धनाला सरकारकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. पशु आणि दुग्ध व्यवसायात वाढलेल्या जीडीपीत महत्त्वाची भूमिका पशु वैद्यकीय रुग्णालयांची आहे. पशु संवर्धनाचे काम करणारी ही रुग्णालये आता डिजिटलायझेशनकडे वाटचाल करीत आहे. याचाच एक भाग म्हणून नागपूर जिल्ह्यातील ४० पशु रुग्णालयांना ‘आयएसओ’चा मान मिळाला आहे.
शेतकऱ्यांना दुग्ध व चारा उत्पादनाची जोड मिळाल्यास ते समृद्धतेची कास धरू शकतात हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा स्थानिक पशु रुग्णालयांच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन मिळेल. आपली भूमिका ही मार्गदर्शकाची असावी, हा हेतू पशु रुग्णालयांचा आहे. पुढील काळात ही रुग्णालये शेतकऱ्यांच्या प्रगतीचा तारणहार ठरण्याची शक्यता आहे़ नागपूर जिल्ह्यात वर्षभरात आयएसओ मानांकन मिळविलेली ४० रुग्णालये ही लोकसहभागातून झाली आहे. शासनाचा एक पैसाही या प्रक्रियेवर खर्च झाला नाही़ त्यामुळे पशुसंवर्धन विभागाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे़
शासन अधिकृत अखिल भारतीय स्तरावरील एका कंपनीने हा आएसओचा मान ४० रुग्णालयांना दिला आहे़ यामध्ये सर्व दस्तऐवज अद्ययावत झाले आहे, परिसर स्वच्छता, विविध योजनांची माहिती, शेतकऱ्यांना वर्गीकृत सुविधा, कृत्रिम रेतन, उत्तम पशुपैदास, हिरव्या चाºयांचे बारामाही उत्पादनावर मार्गदर्शन व प्रोत्साहन, गांडुळखत व जलपुनर्भरण प्रकल्प, अशा स्वरूपाचे दोन डझन उद्धिष्टे या रुग्णालयांनी साध्य केली आहे़
- या पशु रुग्णालयांचा समावेश
नांदागोमुख, पाटणसावंगी, मोहपा, कोहळी, हिंगणा, गुमगाव, वडोदा, कोराडी, गुमथळा, टेमसना,लाडगाव, झिल्पा, मेटपांजरा, कोंढाळी, मांढळ, कुही, साळवा, अरोली, मौदा, चाचेर, कोदामेंढी, आजनगाव, नरखेड, जलालखेडा, सावरगाव, पिपहा, मेंएळला, कन्हान, पारशिवनी, करवाही, साटक, माहुली, बेला, मकरधोकडा, बोरगाव, चारगाव, भिवापूर तर राज्य शासन अखत्यारितील काटोल व सावनेर पशुरुग्णालयांचा समावेश आहे़
- शेतकरी, शेती आणि त्यांच्याकडील गोपालन, यासाठी जिपच्या पशुरुग्णालयाशी शेतकऱ्यांचा वारंवार संबंध येतो़ त्यामुळे तितक्याच सक्षमपणे व वेळेत त्यातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना सेवा द्यावी लागते़ हे प्रयत्न कारणी लावल्यानेच या सर्व रुग्णालयांना हा मान मिळाला आहे. रुग्णालयाच्या माध्यमातून ज्या सेवासुविधा पुरविल्या जातात, त्यात आणखी सुधारणा करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- डॉ. उमेश हिरुळकर जिल्हा पशु संवर्धन अधिकारी, जि.प.