नागपूर : शवविच्छेदनगृहात अनेकांना जाण्याची भीती वाटते. त्यातही मृतदेहाला स्पर्श करायचे म्हटले तरी भल्याभल्यांची बोलती बंद होते. येथे काम करणारी व्यक्ती मद्यपान करून काम करीत असावी, असा समज अनेकांचा असतो; पण नागपुरातील मेडिकलच्या शवविच्छेदनगृहात मागील १४ वर्षांपासून काम करणारे अरविंद पाटील या कर्मचाऱ्यांने हा समज खोडून काढला आहे. निर्व्यसनी राहून तब्बल ३२ हजारांवर मृतदेहांचे त्यांनी शवविच्छेदन केले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) शवविच्छेदन ५२ वर्षीय गृहात पाटील हे २००८पासून काम करीत आहेत. अनैसर्गिक किंवा संशयित मृत्यू, आत्महत्या किंवा पोलिसांनी शिफारस केलेल्या मृतदेहाचे ते डॉक्टरांच्या सूचनेनुसार शवविच्छेदन करतात. यातून नेमका कशामुळे मृत्यू झाला त्याचे कारण शोधले जाते. त्याचा अहवाल नातेवाईकांना व पोलिसांकडे दिला जातो. हे अत्यंत जिकिरीचे आणि हिंमतीचे काम असल्याचे पाटील म्हणतात.
-पहिल्यांदा शवविच्छेदन करताना हात थरथरले
पाटील यांनी सांगितले, १९८४ मध्ये मेडिकलमध्ये अस्थायी कर्मचारी म्हणून रुजू झालो. सुरुवातीला धोबी, सुरक्षारक्षक म्हणून कामाला सुरुवात झाली. नंतर किचनपासून ते शस्त्रक्रियागृहापर्यंतची कामे मिळाली. २००८ मध्ये नोकरी स्थायी झाली आणि पहिलेच काम शवविच्छेदनगृहाचे मिळाले. तेथील कुजलेले, छिन्नविछिन्न मृतदेह पाहून चक्करच आली. ते उचलणे आणि शिवण्यापासून कामाला सुरुवात झाली. थरथरत्या हाताने त्यावेळी केलेले काम आजही आठवते. काम सोडून द्यावे, दुसरे करावे असे वाटत होते; परंतु नोकरी जाईल या भीतीने काम करीत राहिलो. डॉक्टर आणि त्यावेळच्या सहकाऱ्यांमुळे तग धरू शकलो. आता कशाचीही भीती वाटत नाही; परंतु हे काम फार महत्त्वाचे व जिकिरीचे आहे.
-रोज ४ ते ५ मृतदेहाचे शवविच्छेदन
मेडिकलच्या शवविच्छेदनगृहात रोज ७ ते ८ तर उन्हाळ्यात १० ते १५ मृतदेह येतात. आता या गृहात कर्मचारी म्हणून मी वरिष्ठ असल्याने सुरुवात मलाच करावी लागते. रोज ४ ते ५ डॉक्टरांच्या सूचनेनुसार मृतदेहाचे शवविच्छेदन करावे लागते. मागील १४ वर्षांत जवळपास ३२ हजारांवर मृतदेहाचे शवविच्छेदन केले असेल, असेही पाटील म्हणतात.
-प्रत्येक अवयव वेगळा करावा लागतो
एखाद्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे, हे पाहण्यासाठी डॉक्टरांच्या सूचनेनुसार मृतदेहाला गळ्यापासून ते पोटाच्याखालपर्यंत चिरा द्यावा लागतो. हे काम डॉक्टरही करतात. त्यानंतर शरीरातील प्रत्येक अवयव वेगळा केला जातो. यात प्रथम हृदय, फुफ्फुस, यकृत, मूत्रपिंडे, पोटातील आतडे आणि सरतेशेवटी मेंदूची तपासणी करण्यासाठी डोक्याची बाजू खोलली जाते. या सर्व अवयवांवर काय परिणाम अर्थात मारहाण, अपघातात इजा होणे याची माहिती कळते आणि त्याचा अहवाल डॉक्टर बनवितात. हाच शवविच्छेदन अहवाल होय.
-पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा
पाटील म्हणाले, शवविच्छेदनगृहात काम करणाऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अनेकांचा वेगळा असतो. तो बदलला पाहिजे. इतरांप्रमाणे हेही एक महत्त्वाचे काम आहे. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे डॉ. मुखर्जी नेहमीच आमच्या कामाचे नेहमी कौतुक करून आत्मविश्वास दृढ करतात.