पुन्हा थंडी परतली, नागपूर, गोंदियात कडाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 11:56 AM2021-01-15T11:56:19+5:302021-01-15T11:56:37+5:30
Nagpur News गेल्या आठवड्यात जवळपास गायब झालेली थंडी पुन्हा परतली आहे. नागपूर महानगरासह गोंदियामध्ये थंडीचा कडाका अधिक जाणवायला लागला असून वातावरणातही बदल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या आठवड्यात जवळपास गायब झालेली थंडी पुन्हा परतली आहे. नागपूर महानगरासह गोंदियामध्ये थंडीचा कडाका अधिक जाणवायला लागला असून वातावरणातही बदल झाला आहे.
हवामान विभागाने दिले्ल्या माहितीनुसार, गुरुवारी नागपुरातील कमाल तापमान ११.६ अंश सेल्सिसन नोंदविले गेले. गेल्या २४ तासात शहरातील किमान तापामानामध्ये ३.४ अंश सेल्सिअसने घट झाली आहे. अलीकडच्या दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणावर तापमान खालावण्याची शहरातील ही पहिलीच वेळ आहे. यामुळे गुरुवारी सकाळपासूनच वातावरणात थंडीचा कडाका जाणवत आहे. दिवसभरही थंडी कायम होती. सायंकाळनंतर थंडीत अधिक भर पडली. शहरामध्ये सकाळी ४५ टक्के तर सायंकाळी ४४ टक्के आर्द्रता नोंदविण्यात आली. सायंकाळीही यात फारसा फरक पडलेला नव्हता. दुपारी ४ वाजताच्या सुमारास आकाश ढगाळलेले होते. मात्र वारेही वाहत असल्याने थंडीही तेवढीच जाणवत होती.
गोंदियातही गुरुवारी कमाल तापमान ९.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. विदर्भात तिथे सर्वाधिक पारा खालावल्याची नोंद झाली आहे. गोंदियातील तापमानामध्ये १.५ अंश सेल्सिअसने घट झाली. गेल्या २४ तासांपासून तिथेही थंडी बरीच वाढली आहे.
विदर्भातील तापमान
विदर्भात गोंदिया सर्वाधिक थंड होते. त्यानंतर नागपूरमध्ये पारा खालावल्याची नोंद आहे. या सोबतच वर्धा १२.४ अंश सेल्सिअस, गडचिरोली १३.६, अकोला १४, अमरावती आणि बुलडाणा १४.५, चंद्रपूर १४.८ अंश सेल्सिअस अशी नोंद झाली. वाशिम आणि यवतमाळातील पारा मात्र बराच वर होता. वाशिममध्ये १७.२ तर यवतमाळात १५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.